जळगाव – जिल्ह्यात मंगळवारी गारपिटीसह वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे १४ तालुक्यातील सुमारे ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. सर्वाधिक ४२७९ हेक्टरवरील केळीच्या बागा वादळी पावसामुळे भूईसपाट झाल्या असून, केळी उत्पादक तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हवालदिल झाले आहेत.

हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात मंगळवारी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची व विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार, अमळनेर वगळता बहुतांश सर्व तालुक्यात झालेल्या गारपिटीसह वादळी पावसाने केळीच्या बागांसह पपई, मका, ज्वारी, बाजरी, कांदा, उन्हाळी मुगाचे नुकसान झाले. जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तालुकानिहाय आढावा घेऊन ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीची आकडेवारी बुधवारी जमा केली. त्यातून ५८८ गावांमधील सुमारे १२ हजार २२८ शेतकरी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे बाधीत झाल्याचे आढळले.

काढणीच्या आणि वाढीच्या अवस्थेतील केळीच्या बागांचे जळगाव तालुक्यात सर्वाधिक १३२० हेक्टर तसेच चोपडा तालुक्यात ६६३, रावेर ५१९, यावल ४३६, एरंडोल २५४, मुक्ताईनगर तालुक्यात २५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. इतरही तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात केळीच्या बागांच्या नुकसान नोंदविले गेले. याव्यतिरिक्त जिल्हाभरात उन्हाळी मक्याचे ७१७ हेक्टर, बाजरी ५०७, ज्वारी २१४, कांदा ३०१, पपई २४९ आणि इतर फळपिकांचे ७५१ हेक्टर असे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची तक्रार प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या १४४४७ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा ७०६५५१४४४७ या व्हाटस्ॲप क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

धरणगाव, चोपड्यात तीन म्हशी मृत्युमुखी

मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील एकलग्न बुद्रुक (ता.धरणगाव) येथील ढोलू पाटील यांच्यासह धारागीर (ता.एरंडोल) येथील सुरेश पाटील यांच्या म्हशी अंगावर वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडल्या. याशिवाय, चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील युवराज बाविस्कर यांच्या म्हशीचा अंगावर झाड पडल्याने जागीच मृत्यू झाला.