जळगाव – महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागल्यानंतर शहरातील सर्व ७५ जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार भाजपने केला असताना, शिवसेनेनेही (एकनाथ शिंदे) आता भाजपचे आव्हान स्वीकारण्याची तयारी केली आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांना हलक्यात घेऊ नका, असा थेट इशारा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी भाजपला दिल्याने जळगावमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्यानंतर सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा मनोदय भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी नुकताच व्यक्त केला. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील घटक इतर पक्षांमध्ये खळबळ देखील उडाली आहे. त्याविषयी अजित पवार गटाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नसताना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मात्र अस्वस्थ झाली आहे. भाजप स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करत असल्याने युतीतील समन्वयावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, भाजपच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख भंगाळे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची भूमिका त्यांनी समाज माध्यमावर एका मुलाखतीतून मांडली.

गेल्या वेळी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जळगाव महापालिकेची निवडणूक लढविली होती. आणि त्या माध्यमातून सत्तेत सहभागी होऊन शहराचा विकास कसा होईल, त्यासाठी प्रयत्न केला. आगामी निवडणूक युतीच्या माध्यमातून लढायची असल्यास आमचे नेते एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील आदेश देतील त्याप्रमाणे महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ, असे विष्णू भंगाळे म्हणाले. महायुतीचा विषय आहे. जर युती होत असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा. नाही तर संपूर्ण जागा लढण्याची तयारी आम्ही करू शकतो. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू असल्याचेही भंगाळे यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराच्या विकासामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आमदार किंवा खासदारांनी आणला त्यापेक्षा जास्त निधी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरासाठी दिला. जळगावसाठी मंत्री पाटील यांनी उपलब्ध केलेल्या निधीचा आकडा १२५ कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. आणि सध्या शहरात दिसत असलेली ७० ते ८० टक्के कामे ही त्याच निधीतून पूर्ण झाल्याचा दावाही भंगाळे यांनी केला. आज आमचे २० ते २५ नगरसेवक असून, इतर प्रभागांमध्येही चाचपणी सुरू आहे. निवडणुकीत युती झाली तर आम्ही युतीचा आदेश पाळू. युती नाही झाली तर स्वबळावर लढण्यास आम्ही मोकळे आहोत, असेही भंगाळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छूक असल्याचेही त्यांनी सांगितले.