जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीनंतर सोने आणि चांदीचे दर कमी होतील, अशी आशा ग्राहकांसह व्यावसायिक बाळगून होते. प्रत्यक्षात, सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घट नोंदवली गेली. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून भारतातील सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे. दीर्घकालीन वाढत्या किमतीनंतर आता दोन्ही धातुंचे दर थोडे नरमले आहेत. तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमती डॉलर मजबूत झाल्यामुळे तसेच अमेरिका व चीनमधील व्यापार कराराच्या अपेक्षेमुळे घसरल्या आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार करारासाठी ठोस रचना तयार केली जात आहे. ज्यामुळे व्यापार करार होण्याची शक्यता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती ०.५ टक्क्यांनी घसरून ४,०९२.७६ डॉलर प्रति औंसवर आहेत. दरम्यान, अमेरिकन सोन्याचा वायदा ०.७ टक्क्यांनी घसरून ४,१०६.८० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
सततच्या घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमती आता त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा बऱ्याच खाली आल्या आहेत. या चढ-उताराचा थेट परिणाम मध्यमवर्गीयांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुवर्ण बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम आणि चांदी प्रति किलो स्वस्त झाली आहे. येत्या काळात किमती आणखी घसरण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जळगाव शहरातही १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख ३५ हजार ४४५ रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात पुन्हा १०३० रूपयांची घट नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोने जीएसटीसह एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत घसरले होते. मात्र, शनिवारी सकाळी आणखी ९२७ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोने जीएसटीसह एक लाख २७ हजार ६१७ रूपयांपर्यंत पोहोचले होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच ६१८ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख २६ हजार ४८४ रूपयांपर्यंत खाली आले.
चांदीचे दर स्थिर
शहरात १५ ऑक्टोबरला चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ९२ हजार ६१० रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, लक्ष्मीपूजनापर्यंत चांदीचे दर एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत खाली आले. नंतरही घसरण सुरू राहिल्याने बालिप्रतिपदेला चांदी एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत घसरली. मात्र, शनिवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर एक लाख ५७ हजार ५९० रूपयांपर्यंत पोहोचले. सोमवारी सकाळी कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले.
