जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत लक्ष्मीपूजनापर्यंत सोने आणि चांदी चांगलाच भाव खाताना दिसून आले. वाढत्या महागाईमुळे ग्राहकांना दोन्ही धातुंची खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागला. मात्र, दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी सकाळी सोने, चांदीच्या दरात मोठी घट नोंदवली गेली.
या वर्षीच्या विक्रमी वाढीनंतर सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या अल्प प्रतिसादामुळे दोन्ही धातुंची चमक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोने ५.२४ टक्क्यांनी घसरून ४,११४ डॉलरवर आले आहे. २०२५ मध्ये सोन्यात अभूतपूर्व वाढ झाली, ज्याने इतर मालमत्ता वर्गांना मागे टाकले आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मात्र, दिवाळीनंतर सोन्याचे दर कमकुवत होत आहेत.
बुधवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीच्या ट्रेंडचा हा शेवट मानला जात आहे. बुधवारी दिवाळी बलिप्रतिपदा असल्याने शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केट बंद होते. त्यामुळे व्यवहार झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दिवाळीनिमित्त झालेल्या एक तासाच्या मुहूर्त व्यापार सत्रात सोने आणि चांदीच्या किमती कमकुवतच होत्या.
शहरात १७ ऑक्टोबरला सोन्याचे दर एक लाख ३५ हजार ४४५ रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. परंतु, धनत्रयोदशीला तब्बल २७८१ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी जीएसटीसह एक लाख ३२ हजार ३५५ रुपयांपर्यंत खाली आले. तर लक्ष्मीपूजनाआधी सोमवारी दिवसभरात १०३ रुपयांची किंचित वाढ झाल्याने सोन्याचे दर एक लाख ३२ हजार २५२ रुपयांवर स्थिरावले होते.
दरम्यान, मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणखी ६२० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने एक लाख ३२ हजार ८७० रुपयांवर पोहोचले होते. बुधवारी बालिप्रतिपदेला सकाळी बाजार उघडताच मात्र तब्बल ४१२० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख २८ हजार ७५० रूपयांपर्यंत घसरले. आठ दिवसांच्या कालावधीत सुमारे ६७०५ रूपयांनी घट सोन्याच्या दरात नोंदवली गेली.
चांदीचा तोरा उतरला
जळगावात १५ ऑक्टोबरला चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ९२ हजार ६१० रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर मात्र चांदीच्या दरात कमी-अधिक प्रमाणात घसरण सुरू झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवारी देखील चांदीचे दर एक लाख ६९ हजार ९५० रूपयांवर स्थिर होते. मात्र, बुधवारी बालिप्रतिपदेला सकाळी बाजार उघडताच तब्बल ५१५० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६४ हजार ८०० रूपयापर्यंत खाली घसरले. आठ दिवसांच्या कालावधीत सुमारे २७ हजार ८१० रूपयांनी चांदीच्या दरात घट नोंदवली गेली.