जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून सातत्याने नवीन उच्चांक प्रस्थापित करणारे सोने आणि चांदीचे दर दसऱ्याच्या दिवशी थोडी नरमले. ग्राहकांसह व्यावसायिकांना त्यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला.

सगळीकडे विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, या प्रसंगी सोने आणि चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणूनच दसऱ्याच्या सणाला सराफा बाजार दरवर्षी गजबजलेला असतो. सुदैवाने, गेल्या आठ दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किमती गुरूवारी थोड्याफार कमी झाल्या. गेल्या एका महिन्यापासून सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते, त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना साने खरेदी करताना घाम फुटला होता. मात्र, दसऱ्याच्या निमित्ताने सोन्याच्या किमतीत थोडीफार घसरण झाली आणि दराची उच्चांकी घोडदौड थांबली.

गुरूवारी आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट गोल्डचे दर स्थिर राहिले. त्यानंतर ते प्रति औंस ३,९०० डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. दरम्यान, अमेरिकन डॉलर निर्देशांक ९७.७२ वर स्थिर राहिला. परिणामी, जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता मर्यादित राहिली.

जळगावमध्ये दसऱ्याच्या एक दिवस आधी बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर एकाच दिवसात दोन हजाराहून अधिक वाढल्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २१ हजार ७४६ रूपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, गुरूवारी दसऱ्याच्या दिवशी सकाळी बाजार उघडताच २०६ रूपयांची किरकोळ घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख २१ हजार ५४० रूपयांपर्यंत खाली आले. दसऱ्याला सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त झाली होती. मात्र, दरात किरकोळ का असेना पण घट झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

चांदीत १०१३ रूपयांनी घट

जळगावमध्ये दसऱ्याच्या आधी बुधवारी तीन हजाराहून अधिक वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५३ हजार ४७० रूपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, दसऱ्याच्या दिवशी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ५२ हजार ४४० रूपयांपर्यंत खाली आले. अनेक ग्राहकांनी आपट्याच्या आकाराची चांदीची पाने खरेदीसाठी गर्दी केली. चांदीचे दर गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने आपट्याचे एक पान सुमारे सव्वादोनशे रूपयांना खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली.