जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सोने दराने प्रति १० ग्रॅम एक लाख १० हजाराचा आकडा ओलांडून नवीन उच्चांक प्रस्थापित केला होता. अनंत चतुर्दशीला शनिवारी बाजार उघडताच मोठी वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याने पुन्हा नवा उच्चांक केला.

अमेरिकेने ५० टक्के आयात शूल्क आकारल्यानंतर उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात देशांतर्गत जीएसटी दरात बदल झाल्यावर काहीअंशी घट होण्याची शक्यता बाळगली जात होती. प्रत्यक्षात, सोन्याच्या किमती सातत्याने नवीन विक्रम करत आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील सोने महाग झाले, तर चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. सोन्याचे दर पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले.

सराफ व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी सोने आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक अनिश्चितता, चलनातील अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांचा वाढता कल, हे दरवाढीला चालना देणारे प्रमुख घटक आहेत.

जागतिक परिस्थितीतील सततचे बदल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात आगामी दिवसांतही अशाच प्रकारचे चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे आणि वाढत्या व्यापार युद्धाच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास सोन्याकडे अधिकच वाढला आहे. याच काळात चीन आणि रशिया यांसारख्या देशांनी त्यांच्या केंद्रीय बँकांमार्फत मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता, महागाईची भीती आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी ठेवले जाणे, या सर्व कारणांमुळेही सोने गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षित पर्याय ठरत आहे.

भारतीय बाजाराच्या दृष्टीने पाहता डॉलरच्या तुलनेत रुपयाची सततची घसरण, हा देखील सोन्याच्या किमती वाढवणारा महत्त्वाचा घटक आहे. या सर्व घडामोडींमुळे सोने पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांकाकडे वाटचाल करत आहेत. जळगावमध्ये शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १० हजार १०१ रूपयांपर्यंत होते. त्यात शनिवारी बाजार उघडताच ९३३ रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ११ हजार ३४ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.

चांदीचे दर स्थिर

जळगावमध्ये शुक्रवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २८ हजार ७५० रूपयांपर्यंत पोहोचले होते. आदल्या दिवशी नवीन उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या चांदीच्या दरात शनिवारी कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिरच राहिले.