जळगाव – जिल्ह्यात जून महिना संपण्यावर आला तरी कुठेच अद्याप पावसाला जोर नाही. निम्म्या तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने खरिपाच्या पेरण्याही रखडल्या आहेत. पावसाला आणखी काही दिवस उशीर झाल्यास खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी २६ जूनअखेर सरासरी ११८.७ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा सरासरी ८८.५ मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे. त्यातही १५ पैकी निम्म्या तालुक्यांमध्ये सरासरी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. रावेरसह यावल, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, चोपडा या काही तालुक्यांचा त्यात समावेश आहे. पैकी रावेरमध्ये एक जूनपासून आतापर्यंत जेमतेम ३८.८, अमळनेरमध्ये ५०.८, यावलमध्ये ५२.३, धरणगावमध्ये ६७.७, मुक्ताईनगरात ७६.१, जामनेरमध्ये ९५.३, चोपड्यात ८१.९, चाळीसगावमध्ये ९२.७, भडगावमध्ये ९९.७ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. अपवाद फक्त जळगावसह भुसावळ, एरंडोल आणि पारोळा, या चार तालुक्यांत १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
६९ टक्के क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या
जून महिन्यात चांगला दमदार पाऊस झाल्यास शेतकरी खरिपाच्या पेरण्या आटोपण्यावर भर देतात. मात्र, यंदा जूनमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ३४ टक्क्यांनी कमी पाऊस पडल्याने जमिनीत पेरणीसाठी आवश्यक असलेला पुरेसा ओलावा निर्माण होऊ शकलेला नाही. परिणामी, शेतकऱ्यांना घरात बियाणे आणून पडलेले असतानाही खरीप पिकांच्या पेरण्यांना चालना देता आलेली नाही. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात २४ जून अखेर दोन लाख २८ हजार १५९ हेक्टर (३०.७२ टक्के) क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. जवळपास ६९ टक्के क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.