जळगाव : जिल्ह्यात हमीभावाने कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) घालून दिलेल्या अटी आणि नियमांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्व नोंदणीसह नमुना तपासणीच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. परिणामी, सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर आतापर्यंत अत्यंत कमी कापूस खरेदी झाली आहे.
जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा फटका बसल्याने यंदा कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सततच्या कापसाची बोंडे झाडावरच कुजली. हाती आलेल्या कापसाचा दर्जा पावसात भिजल्याने खालावला. उत्पादनातही लक्षणीय घट झाली आहे. शेतकऱ्यांचा खर्च तेवढाच झाला असला, तरी उत्पादन कमी झाल्याने सर्वांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच खुल्या बाजारात कापसाला सात हजार रूपयांपेक्षा जास्त भाव नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. कापसाचे भाव घसरल्याने आणि उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.
सुदैवाने, केंद्र सरकारने कापसासाठी हमीभाव ८,११० रुपये निश्चित केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याची मागणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार, संपूर्ण जिल्ह्यात १५ ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यापैकी काही केंद्रे सुरू देखील झाली आहेत.
मात्र, यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करताना क्लिष्ट अटींमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कापसातील ओलावा आणि कचऱ्याच्या प्रमाणासोबतच या वर्षी नोंदणीसाठी कपास किसान ॲपची सक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या ॲपवरील नोंदणी प्रक्रिया अत्यंत कठीण आणि वेळखाऊ असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अनेक शेतकरी मोबाईल वापरात प्रवीण नसल्याने किंवा ॲपची प्रक्रिया समजण्यात अडचणी येत असल्याने नोंदणी करण्यात विलंब झाला आहे. परिणामी, सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापसाची आवक अत्यल्प दिसत आहे.
केंद्रांवरील ओलाव्याचे नियम आणि कागदपत्रांची कडक मागणीही शेतकऱ्यांच्या त्रासात भर घालत आहे. अशा स्थितीत, खुल्या बाजारातील व्यापारी कापूस खरेदीसाठी पुढाकार घेत असून शेतकऱ्यांना तत्काळ वजन, रोख रक्कम देण्याची सुविधा देत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी त्रासदायक प्रक्रियेपासून बचाव करण्यासाठी व्यापाऱ्यांना कापूस देण्यास प्राधान्य देत आहेत. परिणामी, खुल्या बाजारात सुमारे अडीच लाख कापूस गाठींची खरेदी देखील झाली आहे.
नियम व अटी शिथिल करा
सध्या खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा ८०० ते १००० रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीसीआयच्या खरेदी केंद्रावर ८१०० रूपयांच्या हमीभावाने कापूस विक्री करणे फायदेशीर ठरणार आहे. परंतु, पूर्व नोंदणीसह ओलावा आणि मर्यादित कापूस खरेदीच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, सीसीआयच्या खरेदी केंद्रांवरील नियम व अटी शिथिल करून कापूस उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी केली आहे.
