जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागण्यापूर्वीच महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी युती न झाल्यास स्वतंत्रपणे रणांगणात उतरायला आपण तयार असल्याचे ठाम विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्ष देखील आता ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आत्तापासूनच जोरदार तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, निवडणुकीत पक्ष बळकट करण्यासाठी पात्र आणि प्रभावी व्यक्तींना, त्यांचा पूर्वानुभव किंवा पार्श्वभूमी काहीही असो, भाजपमध्ये सामावून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात उभे राहिलेल्यांना पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने घेतला होता. मात्र, आता त्या निर्णयाला तिन्ही घटक पक्षांनी तिलांजली दिली आहे. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देताना काटेकोर पडताळणी (चाळणी) आवश्यक असल्याचा आग्रह मंत्री गुलाबराव पाटील यांनी वारंवार व्यक्त केला होता. तरीही, आधी अजित पवार गट, त्यानंतर भाजप आणि आता शिंदे गटाने पूर्वी महायुतीच्या विरोधात लढलेले असोत किंवा इतर पक्षांत सक्रिय असलेले अशा सर्वांना कोणतीही आडकाठी न करता पक्षात सामावून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आपले वर्चस्व टिकवण्यासाठी भाजप आणि शिंदे गट यांच्यात राजकीय स्पर्धा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने तुलनेने सावध धोरण स्वीकारल्याचे चित्र दिसत होते. शरद पवार गटातील दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांना पक्षात सामावून घेऊन अजित पवार गटाने भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का दिला. मात्र, त्यानंतर या पक्षातील हालचालींना काहीशी मंद गती आली.
नवीन प्रवेश, मेळावे किंवा संघटनात्मक उपक्रमांबाबत पक्षात पूर्वीचा उत्साह कमी झाल्याचे दिसून आले. पक्षाला आलेली ही मरगळ दूर करण्यासाठी संपर्कमंत्री माणिकराव कोकाटे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी तसेच शनिवारी आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी जळगाव आणि रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि जळगाव महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाईल. उमेदवारी अर्ज भरून घेत इच्छुंकाच्या प्रभाव क्षेत्रात सध्या काय परिस्थिती आहे, ते जाणून घेण्यात येईल.
रावेर लोकसभा क्षेत्राची आढावा बैठक शुक्रवारी सकाळी साडेनऊला भुसावळ येथील संतोषी माता सभागृहात होणार आहे. त्याच प्रमाणे जळगाव लोकसभा क्षेत्राची आढावा बैठक शनिवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात होईल. यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, कैलास पाटील, दिलीप सोनवणे, प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील आदी उपस्थित असतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि उमेश नेमाडे, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी दिली.
