जळगाव – राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पक्षात घेतल्यानंतर अजित पवार यांना पुढे पश्चाताप होईल, असे वक्तव्य शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. अजित पवार गटात प्रवेश केल्यावर आता देवकर यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री पाटील एकेकाळी टपरीवर बसायचे. आता ते कुठे आहेत, हे लोकांना कळत नाही का ? जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. मंत्र्यांने जबाबदारीने बोलले पाहिजे. तोल जाऊ देऊ नका, व्यवस्थित बोला, असा इशारा देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना महायुतीतील कोणत्याच पक्षाने प्रवेश देऊ नये म्हणून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोध केला होता. परंतु, त्यांच्या विरोधाला न जुमानता अजित पवार गटाने देवकर यांच्यासह माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि दोन माजी आमदारांचे पक्ष प्रवेश घडवून आणले. त्यामुळे संतप्त मंत्री पाटील यांनी देवकर यांच्यावर जिल्हा बँकेतून घेतलेल्या १० कोटींच्या कर्जासह इतर काही प्रकरणांवरून पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री देवकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यांच्याकडे पैसा असेल किंवा संपत्ती असेल. सगळे काही असेल. पण आपण मंत्री आहोत. सत्ताधारी पक्षामध्ये आहोत, याचे भान त्यांनी बोलताना ठेवले पाहिजे. मी कोणता गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार केला, ते काही दिवसात समोर येणार आहे. माझ्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. मात्र, ते उठसुठ काहीतरी बोलतात. मी याबाबत सविस्तर बोलणार आहे, असे देवकर यांनी नमूद केले.
मी जिल्हा बँकेतून १० कोटींचे कर्ज नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचा आरोप एकदम चुकीचा आहे. मंत्री पाटील यांनी माहिती घेऊन व्यवस्थित बोलले पाहिजे. मी कोणतेच कर्ज नियमबाह्य पद्धतीने घेतलेले नाही. त्यासाठी कर्जाच्या दुपटीची संपत्ती बँकेकडे तारण ठेवली आहे. कर्ज देण्यापूर्वी संचालक मंडळाने रितसर ठराव देखील केला आहे. त्यानंतर कर्ज मंजूर झाले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कर्जफेड नियमितपणे सुरू आहे. सदरचे कर्ज मी निवडणुकीच्या दोन वर्ष आधीच घेतले आहे. आणि ते योग्य कारणासाठी वापरले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी इमारत भाड्याने देतानाही सर्व काही प्रक्रिया नियमानुसार व करारानुसार झाली आहे. शासनाची त्यात कोणतीच फसवणूक केलेली नाही, असेही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नमूद केले.