जळगाव : जिल्ह्यातील काही दिग्गजांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश करून राष्ट्रवादीला (शरद पवार) काही दिवसांपूर्वी मोठा हादरा दिला होता. त्यातून सावरत डागडुजीचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून केला जात असतानाच आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून (उध्दव ठाकरे) शरद पवार गटाला हादरला बसला आहे. यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटात मोठी मरगळ आली होती. तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये अजिबात उत्साह राहिला नव्हता. मात्र, तशाही परिस्थितीत पक्षाच्या पहिली फळीतील नेत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खंबीर राहुन द्विधा मनःस्थितीतील कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पक्ष श्रेष्ठीही एकदम निश्चिंत होते. परंतु, माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, कैलास पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केल्यावर शरद पवार गटाला चांगलाच धक्का बसला.

त्यातून सावरण्यासाठी पक्षाचे निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात नंतर शरद पवार गटाने तालुकानिहाय मेळावे घेतले. पक्ष संघटन मजबुतीसाठी नवीन नियुक्त्या करण्याच्या हालचाली वाढविल्या. शेतीविषयक प्रश्नी आंदोलने करून महायुतीला कोंडी पकडण्याचा प्रयत्न केला. पक्षाला अनेक दिग्गज सोडून गेल्यानंतरही कोणताच फरक पडला नसल्याचे त्यातून भासविण्यात आले.

असे असताना, अडचणीच्या काळातही एकनिष्ठ राहिलेल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पूर्वीसारखा सन्मान राहिला नसल्याचे कारण देऊन आता दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा मार्ग निवडला आहे. शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा भारतीय एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक सोनवणे त्यापैकीच एक. सोनवणे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीतीलच शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केला आहे. त्याबरोबरच शरद पवार गटात सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कलहाविषयी मोठे वक्तव्य करून आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी शरद पवार गटावर नव्हे तर, जिल्ह्यातील काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होतो. शरद पवार गटात अलिकडे मागासवर्गीयांना एकाकी पाडले जात असून, त्यांच्या अडचणी कोणीच समजून घेत नाही. जिल्हा कार्यकारिणीतही मागासवर्गीयांना कोणतेच स्थान नाही.- अशोक सोनवणे (जिल्हाध्यक्ष- सामाजिक न्याय, शरद पवार गट, जळगाव)