जळगाव – तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते रोहित पवार यांनी मागे व्हायरल केला होता. तो व्हिडीओ त्यांनी कसा काढला, असा प्रश्न कोकाटे यांनी आता उपस्थित केला आहे. दरम्यान, जळगावमध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त आल्यावर पवार यांनी त्या संदर्भात नवा दावा केल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

तत्कालीन कृषिमंत्री कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाइलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार यांनी जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. विरोधी पक्षांनी सुद्धा कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी नंतर राज्यभर रस्त्यात पत्ते खेळून, त्यांच्या प्रतिमेला काळे फासून निदर्शने केली होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांच्याकडे क्रीडा खाते सोपविले.

दरम्यान, व्हायरल व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या वादानंतर आपली शेतकरी आणि पक्षामध्ये प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे. रोहित पवार यांच्या विरोधात नाशिक न्यायालयात फौजदारी दावा देखील दाखल केला आहे.

कोकाटे यांनी नोटीस बजावल्यानंतरही रोहित पवार यांनी माफी मागितलेली नाही. किंवा त्यांच्या नोटीशीला उत्तरही दिलेले नाही. त्यामुळे कोकाटे यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. सोमवारी त्यासंदर्भात नाशिकच्या न्यायालयात कोकाटे यांचे म्हणणे नोंदवून घेण्यात आले. रोहित पवार हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे आपला व्हिडीओ कोणी काढला आणि तो पवार यांना कोणी दिला. तसेच तो व्हिडीओ त्यांनी व्हायरल का केला, असे अनेक प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित केले आहेत. आपली बदनामी केल्याप्रकरणी पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी न्यायालयाकडे वकिलांमार्फत केली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा तो रमी खेळतानाचा व्हिडीओ कसा आला त्या बाबतचा खुलासा केला.

आपल्याला कोकाटे यांच्या संदर्भातील तो वादग्रस्त व्हिडीओ एका पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मिळाला होता. आणि तो पेन ड्राईव्ह कोणी पाठवला होता, ते मलाच माहिती नाही. पेन ड्राईव्ह पाठविणारा एखादा सत्ताधारी पक्षाचा आमदार देखील असू शकतो, जो कोकाटे यांच्या मागे बसलेला असेल. किंवा दुसरा कोणी व्यक्ती असू शकेल. माझे तर म्हणणे आहे, ज्याने कोणी तो व्हिडीओ मला पाठवविला असेल त्या व्यक्तीचे नाव जाहीर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील चार कोटी शेतकरी त्याचा सत्कार करतील, असाही टोला रोहित पवार यांनी हाणला.

कोकाटेंमुळे २० हजार कोटींचे नुकसान

मंत्री कोकाटे यांनी अधिवेशनावेळी जे काही उत्तर मला दिले होते, ते सर्वांना माहिती आहे. मी पीक विम्याचे चार ट्रीगर जे त्यांनी काढले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आणून दिले होते. मात्र, माझ्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. कृषिमंत्री म्हणून सभागृहात कर्तव्य निभावण्याऐवजी ते पत्ते खेळण्यात व्यस्त होते. त्यांच्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे २० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोपही रोहित पवार यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना केला.