नाशिक – वळीव पावसाने राज्यात २७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यात सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी दिली. खतांबरोबर इतर काही विकत घेण्याची (लिकिंग) सक्ती केल्यास, बनावट बियाण्यांची विक्री केल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

येथे जिल्हा खरीप हंगामपूर्व बैठकीनंतर कृषिमंत्री कोकाटे यांनी पावसामुळे अमरावती जिल्ह्यात १४ हजार तर, नाशिक जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले. राज्यात पावसामुळे सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा अंदाज येण्यासाठी एक-दोन दिवसांचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. आठव़़डाभरात नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला विलंब होतो. खरीपपूर्व किंवा रब्बीपूर्व मदत मिळाल्यास त्यांना शेतात भांडवलासाठी ती कामी येऊ शकते. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडली जाईल, असे कोकाटे यांनी नमूद केले. राज्यात युरियासह इतर खतांचा पुरेसा साठा असून कुठेही अडचणी येणार नाहीत. बनावट बियाण्यांची विक्री होऊ नये, यावर पथके लक्ष ठेवून आहेत. अशा प्रकारात कंपन्यांना भरपाई देणे बंधनकारक राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

खरीप हंगामात अधिकाऱ्यांना रजेवर जाण्यास बंदी

कृषी सहायकांनी संप पुकारत खरीप हंगामात शेतकरी आणि सरकारला वेठीस धरण्याचे काम सुरु केले आहे. कृषी सहायकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असतांनाही ते संपावर गेल्याने संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच खरीप हंगामात कृषी विभागातील कोणतेही अधिकारी ,कर्मचारी रजेवर जाणार नाहीत. खरीपाची लागवड होईपर्यंत त्यांची रजा बंद असेल, असेही कोकाटे यांनी सूचित केले.