मालेगाव : शहरातील गुलशननगरात भर रस्त्यात गोळीबार आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चार गुंडांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून गावठी बंदूक जप्त करण्यात आली.
मंगळवारी सायंकाळी अनिस शेख उर्फ अनिस मटकी (४१) हे घराकडे जात असताना एका टोळक्याने त्यांना रस्त्यात गाठले. त्यांच्यावर आधी गोळीबार करण्यात आला. नंतर शस्त्र व लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात अनिस हे गंभीर जखमी झाले. रब्बानी नामक दादा आणि अनिस यांच्यामध्ये वाद होते. त्यातून रब्बानी व त्याच्या साथीदारांकडून हा हल्ला झाल्याची तक्रार अनिसच्या नातेवाईकांनी केली. त्यानुसार पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर संशयित फरार झाले होते.
जून महिन्यात अख्तर काल्या या सराईत गुन्हेगाराने किरकोळ कारणावरून सख्ख्या भावावर गोळीबार केल्याचा प्रकार शहरात घडला होता. पोलिसांनी त्याला चाळीसगाव येथे अटक केली, तेव्हा त्याच्याकडे गावठी बंदूक आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली होती. तत्पूर्वी चाळीसगाव फाट्यावरील एका हॉटेलजवळ खालिद खान अब्दुल रहेमान या व्यापाऱ्याच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील आणि अपर अधीक्षक तेगबिरसिंग संधू यांनी गोळीबाराच्या ताज्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यासाठी पवारवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन वेगवेगळ्या पथकांकडे जबाबदारी सोपवली.
संशयित हे म्हाळदे शिवारात असल्याची माहिती निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाल्यानंतर सापळा रचून शेख रब्बानी उर्फ रब्बानी दादा (३४), नवीन अख्तर अब्दुल करीम (३८), शेख वासिम शेख युनूस (२२) आणि शेख शब्बीर शेख फारूक (२४) या चौघांना अटक करण्यात आली. यातील शेख वासिम याच्या अंगझडतील एक देशी बंदूक आढळली. हे सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे सात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.