नंदुरबार – जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार) आयोजित सुसंवाद बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोरच पक्षातील विसंवाद उघड झाला. पक्षात काम करण्यावरुन थेट कार्याध्यक्षांनीच जिल्हाध्यक्षांसह इतरांवर आपल्या भाषणातून रोष व्यक्त केल्याने प्रदेशाध्यक्ष शिंदे यांना कार्याध्यक्षांचे भाषण थांबविणे भाग पडले.

नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादविवाद सुरु असताना महाविकास आघाडीतही एकी आहे असे नव्हे. त्यामुळे आपआपल्या पक्षांमधील वाद मिटविण्यात प्रदेश पातळीवरील नेत्यांचा वेळ खर्ची पडत आहे. शहादा येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि निरीक्षक सुनील भुसारा यांच्या उपस्थितीमध्ये जैन प्लाझा येथे सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या भाषणाआधी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाषणातून पक्षातील मतभेद उघडपणे मांडले.

जिल्ह्यात पक्षाची परिस्थिती शून्य असतांनाच पक्षातील काही नेते सत्ताधाऱ्यांशी सलगी करुन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची फोडाफोड करत असल्याचा आरोप व्यासपीठावरून झाला. अवघ्या तीन महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतलेल्या एन. डी. पाटील यांनी काम करण्याआधीच त्यांच्या विरोधात उणीदुणी काढण्याचा प्रकार उघड झाला. कार्याध्यक्ष रवींद्र वळवी यांच्या भाषणावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंद यांनी त्यांना थांबविले. पक्षात भांड्याला भांडे लागतेच, असे सांगत प्रदेशाध्यक्षांनी पक्षातील मतभेदांवर पांघरुण घातल्याचे दिसून आले. जनतेचे प्रश्न हेरुन त्यावर सत्ताधाऱ्यांविरुध्द आंदोलन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील महायुतीच्या शासनावर टिका केली. मराठा आरक्षणाला जर मंत्रीमंडळातील छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्रीच विरोध करत असतील तर शासन आणि मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. हैदराबाद गँझेटमधील नावांनाच आरक्षण दिले गेले असले तरीदेखील विरोध होत असेल तर सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसते. या आरक्षणाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी फक्त दोन समांजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शिंदेंनी केला.

लाडक्या बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागातून किंवा इतर विभागातून निधी वळवला जात असेल तर यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे देखील शिंदे म्हणाले. नंदुरबारमध्ये काँग्रेसचे खासदार, आमदार महाविकास आघाडीच्या इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्याची तक्रार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केली आहॆ. याबाबत त्यांना पत्र देखील पाठवले आहे. मात्र तरी देखील जर ते ऐकणार नसतील तर स्वबळाची भूमिका घेण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र जर प्रस्ताव आला तर शरद पवार यांच्याशी विचार करुन निर्णय घेवू, असेही त्यांनी सांगितले.