धुळे : भूखंडाचा पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांच्या नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याने नाशिक येथील नगर भूमापन अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार आणि इतर सहधारक यांच्या नावे मालेगाव येथील इस्लामपुरा येथे एक भूखंड आहे. या भूखंडाची पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून द्यावी, अशी विनंती तक्रारदाराने केली होती. हे काम करून देण्यासाठी नाशिकचे भूमापन अधिकारी (वर्ग-२) पंढरीनाथ चौधरी (५०,रा. राजकमल रो हाऊस, ओमकार नंगर, पेठरोड, नाशिक) यांनी २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी १० लाख रुपयांची लाच मागितली. यामुळे संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पंढरीनाथ चौधरीने १० लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले. खासगी व्यक्ती अन्सारी मेहमूद शफी ७२, रा. मालेगाव) याने ही लाच रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचेही प्राथमिक पडताळणीत उघड झाले. यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी सचिन साळुंखे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परीक्षेत्राच्या अधीक्षका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि धुळे येथील उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील राजन कदम, सुधीर मोरे, रामदास बारेला यांच्या मदतीने ही कारवाई केली. मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…नाशिक : टोमॅटोच्या शेतात गांजा शेती, वणी पोलिसांकडून ४२ लाखांची झाडे जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे, येथे ०२५६२२३४०२० किंवा टोल फ्री क्रमांक-१०६४ यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.