नाशिक : दिवाळी बोनस मिळाला नाही आणि महिनाभराचे वेतनही थकीत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासून शेकडो कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा एकदा ठप्प होऊन प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. या बससेवेला प्रारंभापासून कर्मचाऱ्यांच्या असहकार्याचे ग्रहण लागले आहे. त्यांच्या भूमिकेमुळे सिटीलिंक बससेवा वारंवार ठप्प होत आहे. या प्रकरणी वाहक पुरविण्याचा ठेका असणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त

सकाळी कर्मचाऱ्यांशी वाटाघाटी करून नाशिकरोड आगारातील बसेस सुरू करण्यात आल्या. केवळ तपोवन आगारातील बसगाड्या बंद असल्याचे सिटीलिंक व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस सेवेत कंत्राटी पध्दतीने वाहक कार्यरत आहेत. ते पुरविण्याचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला गेला आहे, त्याच्याकडून कर्मचाऱ्यांना वेतन, बोनस देण्यात दिरंगाई केली जात असल्याची तक्रार होत आहे. सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा विचार करून मनपा प्रशासनाने ठेकेदाराला दोन महिन्यांचे आगाऊ वेतन दिले होते. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. परंतु, संबंधिताने तो दिला नाही. या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली गेली आहे. सिटीलिंकची सेवा ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.

हेही वाचा : नाशिक : पळसेजवळील अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिटीलिंकच्या २५० बसेस शहर व ग्रामीण भागात धावतात. हजारो पासधारक विद्यार्थी सिटीलिंकने प्रवास करतात. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सकाळी विविध थांब्यांवर त्यांना ताटकळत रहावे लागले. बससेवा बंद असल्याची माहिती समजल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. काही पासधारक विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. नोकरदार वर्गाचे हाल होत आहे. पाथर्डी येथील श्री शिवमहापुराण कथा सोहळ्यास हजारो भाविक हजेरी लावत आहेत. त्यांच्यासाठी सिटीलिंकतर्फे जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. बस सेवा बंद असल्याने भाविकांनाही ये-जा करणे जिकिरीचे ठरणार आहे.