नाशिक : शहरातील कामटवाड्यात झालेल्या युवक हत्येची चर्चा विरत नाही तोच, जेलरोड येथे सराईत गुन्हेगाराची हत्या झाली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील संशयित स्वत:हून नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाला. जेलरोड येथील मोरे मळ्यातील बालाजी नगरात गुरूवारी रात्री तडीपार गुंड नीलेश पेखळे याच्या घरी हितेश डोईफोडे (२८), रोहित बंग (२८, रा.संजय गांधी नगर) हे दोघे अवैध दारूच्या धंद्यातील पैशांची मागणी करण्यासाठी गेले.
पैशांवरून वादावादी झाली. नीलेश आणि त्याच्या मित्रांनी हितेश आणि रोहित यांना सळईने मारहाण करण्यास सुरूवात केली. नीलेशने हितेशच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रोहितने जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. रोहित यास नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.जखमी हितेशला नीलेशने तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नाशिकराेड पोलिसांनी नीलेश याला समज देत शरण येण्यास सांगितले. काही वेळानंतर नीलेश नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
शहरात हत्यांची मालिका
वर्षभरापासून शहरात किरकोळ वादातून हत्यांचे सत्र सुरू आहे. कधी टोळीयुध्द तर कधी बदल्याच्या उद्देशाने गुन्हेगार भररस्त्यात दहशत माजवत आहेत. जाधव बंधू हत्याकांड, उंटवाडी येथील अल्पवयीन युवकाची हत्या, सराईत गुन्हेगाराची हत्या, एक रुपयाच्या वादातून झालेली हत्या, अशी हत्यांची मालिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. पोलिसांचा धाक राहिला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.