नाशिक : कर्करोग होऊ नये म्हणून काय करता येणे शक्य आहे, कोणत्या गोष्टी कर्करोगाला रोखू शकतात, हे आधीच लक्षात आले तर सर्वजण कर्करोगाला नक्कीच दूर ठेऊ शकतात. त्यामुळेच या विषयावर डॉक्टर्स ऑन ड्युटी यांच्या वतीने जनजागृती करण्यासाठी औषधांच्या पलीकडले या उपक्रमाअंतर्गत येथे ‘कर्कायन- चला रोखूया कॅन्सर’ या कार्यक्रमाचे आयोजन १२ जुलै रोजी करण्यात आले आहे.
शनिवारी संध्याकाळी पाच वाजता कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात डॉक्टर्स ऑन ड्युटी पथकातील विजय घाटगे, नितीन घैसास, चंद्रकांत संकलेचा आणि विनिता देशपांडे हे चार डॉक्टर सहभागी होणार आहेत. या सर्वांना नागरिकांच्या मनातील प्रश्न विचारून ज्येष्ठ जाहिरातज्ज्ञ नंदन दीक्षित हे बोलते करणार आहेत. कर्क म्हणजे कॅन्सर आणि आयन म्हणजे रस्ता.
कर्करोगाचे मार्गक्रमण रोखणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. सर्व डॉक्टर आपापल्या व्यापातून वेळ काढून केवळ माणुसकीच्या नात्याने हा अनोखा उपक्रम चालवित आहेत. औषधांच्या पलीकडे जाऊन मुळातच एखादा आजार होऊ नये, यासाठी काय करावे, याबाबत ते कायमच रुग्णांना मार्गदर्शन करत असतात. मागील वर्षी ‘जीवनशैली आजारांना प्रतिबंध हाच उपाय’ या विषयावर या चारही डॉक्टरांनी अतिशय प्रबोधनात्मक चर्चासत्र आयोजित केले होते. त्यावेळी अनेक प्रेक्षकांनी असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळेच यावेळी कर्करोगसारख्या दुर्धर रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी पथक सज्ज झाले आहे.
काही महिन्यांपासून सुरू असलेला अभ्यास, सततच्या चर्चा, माहिती संकलन, इतर तज्ज्ञांशी विचारविनिमय, अशा प्रकारे या सर्वांनी तयारी केली असून रूढार्थाने कर्करोगतज्ज्ञ नसूनही ते अतिशय तळमळीने हा विषय लोकांसमोर मांडणार आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी कळत नकळत आपल्याला कर्करोगाकडे घेऊन जात असतात. यामध्ये अगदी टूथपेस्टपासून ते चहाचा कागदी कप, पाण्याची प्लास्टिक बाटली, मिठाई किंवा केकमधला रंग अशा कितीतरी गोष्टी समाविष्ट होतात. आधुनिक आहार-विहार, वाढलेले ताणतणाव , व्यायामाचा अभाव अशी एकूणच बदललेली आणि चुकीची जीवनशैली कर्करोगवाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. यावर उपाय काय, याला प्रतिबंध कसा करायचा. हेच जाणून घेण्याची संधी कर्कायन या कार्यक्रमातून मिळणार आहे. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कर्करोग म्हटले की सर्वांनाच धडकी भरते. पूर्वीपेक्षा आजकाल कर्करोगाचे प्रमाण वाढल्याने हा आजार होऊ नये, यासाठी दक्षता घेणे गरजेचे झाले आहे. नाशिक येथील डॉक्टर्स ऑन ड्युटी यांच्या वतीने त्यासंदर्भातच औषधांच्या पलीकडले या उपक्रमाअंतर्गत जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.