नाशिक : सहा वर्षाची तनुश्री अतिशय गोड मुलगी होती. ती नेहमी स्मितहास्य करत बागडायची. आसपासच्या घरांमध्ये तिचा मुक्तपणे वावर होता. आता तिचे स्मित हास्य कायमचे हरवले, अशा शब्दांत समतानगरमधील रहिवाश्यांनी आपली भावना व्यक्त केली. देव दर्शनासाठी गेलेल्या सोळसे कुटुंबातील आई काजल (३२) आणि तनुश्री या माय-लेकीचा वैजापूर तालुक्यातील समृध्दी महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला. अंत्यसंस्कारापूर्वी काही काळ त्यांचे पार्थिव समतानगर येथे आणण्यात आले होते. त्यावेळी स्थानिकांना गहिवरून आले. अपघाताने अनेक कुटुंबांवर आघात केला. कुणाचे मातृछत्र तर कुणाचे पितृछत्र हरपले.

हेही वाचा : समृद्धीवर महिन्याला ९५ अपघात; नऊ महिन्यांत ११२ जणांचा मृत्यू

समृध्दी महामार्गावरील अपघातात मृत झालेले सर्व १२ जण नाशिक जिल्ह्यातील आहेत. यात टाकळीच्या समतानगर येथील सोळसे या एकाच कुटुंबातील दोन, राजीवनगर येथील गांगुर्डे कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य पाच निफाड तालुक्यातील, तर दोन नाशिक तालुक्यातील आहेत. यात काजल सोळसे (३२) आणि मुलगी तनुश्री (सहा) यांचा समावेश आहे. वाहन दुरुस्तीचे काम करणारे लखन सोळसे हे कुटुंबिय, नातेवाईकांसह देव दर्शनासाठी गेले होते. रविवारी सायंकाळपर्यंत परतायचे नियोजन होते. असे काही अघटित घडेल याची कल्पनाही केली नव्हती, अशी भावना सोळसे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. दररोज हसतखेळत बागडणाऱ्या चिमुकल्या तनुश्रीला निस्तेज पडल्याचे पाहून आसपासच्या रहिवाशांना अश्रू अनावर झाले. तिची आई काजल अतिशय मेहनती होती. स्वत:ची आर्थिक स्थिती बेताची असूनही ती गरजुंना शक्य ती मदत करे, असे सोळसे यांच्या शेजारी राहणाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : समृद्धीवरील अपघातग्रस्त वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी; नाक्यावर तपासणी झाली की नाही ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताने राजीवनगर परिसर मध्यरात्रीपासून पुरता हादरला. या भागातील चार जणांचा मृत्यू झाला. येथील गांगुर्डे या एकाच कुटुंबातील झुंबर गांगुर्डे (५८), सारिका गांगुर्डे (४०) या दाम्पत्यासह मुलगा अमोल (१८) या तिघांचा मृत्यू झाला. झुंबर हे परिसरात मत्स्य विक्री करायचे. दरवर्षी हे कुटुंब देव दर्शनासाठी जात असे. यावेळी गांगुर्डे यांची आकाश व विकास ही दोन मुले घरी राहिली. अपघाताने ते पोरके झाले. याच भागातील अंजना जगताप (४७) यांचाही अपघातात मृत्यू झाला. फर्निचरच्या दुकानात त्या मोलमजुरी करीत होत्या. मैत्रिणीसोबत त्या देव दर्शनाला गेल्या होत्या. गौळाणे येथील रजनी तपासे (३२) यांच्या मृत्यूने लहान भावंडांचे मातृछत्र हरपले. त्यांचे वडील गौतम तपासे हे जखमी झाले आहेत. मोलमजुरी करून हे कुटुंब चरितार्थ चालवायचे.