नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल नाक्याजवळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने प्रतिबंधित गुटखा आणि वाहनासह ६३ लाख २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक, मालक आणि वाहतूकदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगड येथून एका मालवाहू वाहनातून समृद्धी महामार्ग ते घोटी आणि घोटीपासून मुंबई -नाशिक महामार्गाने मोठ्या प्रमाणात सुगंधित प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी आपले विशेष पथक वापरून संबंधित वाहनाचा पाठलाग सुरु केला होता. संबंधित वाहन चालक चहापाण्यासाठी घोटी टोल नाका येथे थांबला असता पोलीस पथकाने वाहन चालक मंगल श्रीनिवास (२३, रा. सिवनी, छत्तीसगड) यास ताब्यात घेतले. छत्तीसगडमधील रायपूर येथील बन्सल ट्रेडर्स यांचा माल घेऊन वाहन मुंबईकडे चालले होते.

हेही वाचा : सप्तश्रृंग गडावर देवीच्या दागिन्यांची मिरवणूक, नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन आणि त्यातील मालाची तपासणी केली असता बाहेर बांधकाम साहित्य आणि आत सुगंधित प्रतिबंधक असलेला तंबाखूयुक्त गुटखा सदृश्य मालाच्या ६० मोठ्या गोण्या आढळून आल्या. याबाबत चालकाकडे चौकशी करून श्रीकृष्ण ट्रेडर्स (भिवंडी), भूपेंद्र शाहू (रा. निराजनंदगाव, छत्तीसगड) यांसह नायक ट्रान्सपोर्टच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.