नाशिक : महायुतीतील तीनही पक्षांनी दावा केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिक मतदारसंघाची जागा नेमकी कुणाला मिळणार, याविषयीचा संभ्रम अद्याप कायम आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही शांतच आहेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे व प्रमुख पदाधिकारी २४ तासांहून अधिक काळ मुंबईत तळ ठोकून आहेत. जागा शिवसेनेकडेच राहण्याची त्यांना आशा आहे. शिवसेनेने सायंकाळी उशिरा जाहीर केलेल्या आठ जागांवरील उमेदवारांत नाशिकचे नाव नसल्याने गोंधळात अधिकच भर पडली. साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागेवर राष्ट्रवादी आग्रही असून छगन भुजबळ हे त्यासाठी इच्छुक आहेत. तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून हा तिढा सोडविला न गेल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

आरोप-प्रत्यारोपामुळे गाजत असलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा महायुतीला गुरुवारी सायंकाळपर्यंत सोडविता आला नाही. मित्रपक्षांकडून ही जागा हिरावली जाण्याच्या धास्तीने नाशिकच्या जागेवर शक्य तितक्या लवकर आपला उमेदवार जाहीर करावा, यासाठी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चार दिवसांत दोनवेळा ठाणे तसेच मुंबई वारी केली. ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवसेनेची ताकद नसल्याचे दावे केले होते. नाशिकच्या जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसले असताना दोघांच्या संघर्षात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उडी घेत जागा स्वत:कडे घेण्याची तयारी सुरू केली.

हेही वाचा : नाशिक : सकल मराठा समाजाकडून लोकसभेसाठी चाचपणी

त्यास विरोध दर्शविण्यासाठी बुधवारी मुंबईत गेलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारीही मुक्काम ठोकला. आदल्या दिवशी त्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही भेट झाली. उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाकडे नाशिकची एकमेव जागा आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादी वा भाजपला दिली जाऊ नये, असा आग्रह पुन्हा धरला गेला. मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जागेवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यामुळे गुरुवारी नाशिकची उमेदवारी जाहीर होईल, या आशेवर गोडसे यांच्यासह पदाधिकारी मुंबईत थांबले. परंतु, सायंकाळपर्यंत शिदे गटाकडून स्पष्टता झाली नाही. शिवसेनेने आठ जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात नाशिकचा समावेश नसल्याने शिवसैनिकांची धास्ती वाढली आहे. नाशिकच्या जागेचे रहस्य उलगडत नसल्याने शिंदे गटासह भाजप व राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी संभ्रमात आहेत. तीनही पक्षांच्या लोकप्रतिनिधीचे मुंबईत नेमका काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे. अधिकृत घोषणा झाली नसल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत आहेत.

हेही वाचा : नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

उमेदवार बदलण्याची ठाकरे गटाची खेळी

महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे गटाने अखेरच्या क्षणी उमेदवारात बदल केल्यामुळे आधीपासून तयारीला लागलेल्या नाराज माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत दिले असताना ऐनवेळी झालेल्या बदलाविषयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. विरोधकांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी पक्षही फोडल्याने राजकीय परिस्थिती बदलली. बदललेली समीकरणे लक्षात घेऊन करंजकर यांच्याऐवजी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. करंजकर यांची लवकरच समजूत काढली जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.