नाशिक – प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका काही ठिकाणी नागरिकांना बसत आहे. सिन्नर आगार यापैकी एक. सिन्नर आगाराच्या बस लहान गावांमध्ये न थांबता थेट उड्डाणपुलावरून जात असल्याने गैरसोय होत आहे. ही बाब सिन्नर आगार प्रमुख, विभाग नियंत्रक यांच्या निदर्शनास आणूनही आवश्यक पाऊले उचलली जात नसल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सिन्नरहून संगमनेर, नाशिककडे रोज कामानिमित्त, शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गांवर शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, सरकारी कार्यालये आहेत. सिन्नरहून संगमनेरकडे जातांना दोडी, दापूर, नांदुरशिंगोटे अशी काही लहान गावे लागतात. सिन्नरपासून पुढे गेल्यावर दोडी जवळ उड्डाणपूल लागतो. अनेक बस गावात न येता उड्डाणपुलावरून जाऊन नांदुरशिंगोटे येथे थांबतात. त्या ठिकाणी १० -१५ मिनिटांची विश्रांती घेतात. त्यानंतर संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ होतात. संगमनेरकडून येतानाही बस दोडी थांबा घेत नाहीत. एखादी बस पुलाच्या अलीकडे प्रवाश्यांना उतरवून देते. यामुळे प्रवाश्यांना पायपीट करावी लागते. बस थांबत नसल्याने नाईलाजाने खासगी वाहनाने नांदुर किंवा सिन्नर गाठावे लागते. याविषयी ग्रामस्थांनी सिन्नर आगार तसेच नाशिक येथील विभागीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. या तक्रारींची दखल घेत उड्डाणपुलाजवळ महामंडळाच्या वतीने बस थांबवण्याची सूचना करणारा फलक लावण्यात आला. परंतु, या सूचनेचे बसचालक पालन करताना दिसत नाहीत.

हेही वाचा >>>महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा

नाशिक किंवा संगमनेरकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाजवळील थांब्याजवळ बसची वाट पाहावी तर, बस उड्डाणपुलावरून निघून जातात. अहमदनगर आगाराच्याच बस या ठिकाणी थांबतात. मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे.

सिन्नर डेपो किंवा अन्य डेपोंच्या बस जर दोडी किंवा अन्य ठिकाणी थांबत नसतील तर, प्रवाश्यांनी थेट वाहन क्रमांकासह तक्रार करावी. जेणेकरून कारवाई करण्यास मदत होईल. या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयाला बसच्या वेळापत्रकाविषयी माहिती देत त्या ठिकाणी फलक लावण्यात येतील.- किरण भोसले (विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक)

प्रवाशांची गैरसोय

सिन्नर परिसरातील नाशिक-पुणे महामार्गावरील लहान गावांच्या थांब्यांवर बस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी उड्डाणपूल झालेला असल्याने बहुसंख्य बस उड्डाणपुलावरून भरधाव निघून जातात. यासंदर्भात तक्रार करुनही कार्यवाही केली जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. परिसरातून शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय वा अन्य कार्यालयांमध्ये ये- जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महामंडळाने याचा विचार करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.