जळगाव : जिल्ह्यासह राज्यात पावसाने ओढ दिली आहे. पिके धोक्यात असून, ऐन श्रावणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्धेअधिक प्रकल्प अद्याप कोरडे असून, पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी करून त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. यंदा सुरुवातीपासूनच राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झालेला नाही. प्रारंभी राज्यातील विशिष्ट भागात झालेल्या अतिवृष्टीखेरीज नंतरच्या दिवसांत पावसाने ओढ दिली. पावसाळ्याच्या दिवसांत तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी म्हणजे, २१ पेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगवलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे.

तुरळक सरींपलीकडे पाऊस होताना दिसत नाही. खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये तसेच थेट उत्तर महाराष्ट्रात नाशिकपासून विदर्भापर्यंत व मराठवाड्यातही पुरेसा पाऊस झलेला नसल्याने प्रकल्पांमध्ये जलसाठा झालेला नाही. अर्ध्याहून अधिक प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी सुरू झालेले टँकर अद्याप काही जिल्ह्यांमध्ये सुरूच असून, ऑगस्ट महिना उलटला तरी टँकरच्या संख्येत आणि टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढच होत आहे. आता पावसाचा केवळ सप्टेंबर महिना राहिला असून, परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत.

हेही वाचा : यंदाच्या वर्षात नाशिकच्या गुन्हेगारीत घट, गुन्हे उकल होण्याच्या प्रमाणात वाढ, १३ हजार टवाळखोरांवर कारवाई

दुष्काळाचे भीषण वास्तव समोर असताना सरकार मात्र त्याबाबत उदासीन आहे. या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. २०१५ मध्ये तत्कालीन सरकारमध्ये असताना अशीच दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी महसूलमंत्री म्हणून राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली होती, असे खडसे यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा : नाशिकमध्ये मित्रांकडून युवकाची हत्या, अपघाताचा बनाव करणारे दोन संशयित ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विज्ञान- तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली असून, त्याचा उपयोग कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी होणे गरजेचे आहे. पिके टिकविण्यासाठीचा कालावधी हातून निघून जात आहे. अशा वेळी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी, चारा आदींची व्यवस्था करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन चर्चा करणार आहोत, तसेच विरोधी पक्षांच्या वतीने सरकारला निवेदनही देणार आहोत, असेही खडसे यांनी सांगितले.