नाशिक – शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी औद्योगिक वसाहत परिसरातील कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधीतून लवकरच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विविध कंपन्यांकडून प्रस्तावित कॅमेऱ्यांची संख्या ७६८ असून त्यापैकी २१३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

शहरात वाहन चोरी, जबरी चोरी, लुटमार, सोनसाखळी चोरी, वाहन तोडफोड यासह इतर गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये विधीसंघर्षित बालकांचा सहभाग अधिक आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाला मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यातच आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेत शहरात शांतता असणे गरजेचे झाले असल्याचे लक्षात घेत उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने नाशिक पोलिसांच्या वतीने गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत होणार असल्याने असे कॅमेरे शहरात ठिकठिकाणी बसविण्याचे पोलिसांचे नियोजन आहे. पोलिसांच्या मदतीसाठी परिसरातील औद्योगिक कंपन्या पुढे आल्या आहेत.

याविषयी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली. औद्योगिक परिसर, सार्वजनिक ठिकाणे, वसाहती, अशा ठिकाणी चोरी, लुटमारीच्या घटना घडल्यास संशयितांपर्यंत पोहचण्यासाठी सीसीटीव्ही प्रभावी माध्यम ठरत असल्याचे कर्णिक यांनी सांगितले. मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये सीसीटीव्हींची संख्या कमी आहे.

औद्योगिक कंपन्यांना बाहेरील आवारात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) यांच्यासह अन्य औद्योगिक संघटनांशी चर्चा झाली आहे. काही कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधीतून कॅमेरे बसविण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये बॉश १२०, जेएनपीए ४६४ , ल्युसी ५२, मलबार ३२, आयएसी १०० याप्रमाणे एकूण ७६८ कॅमेरे प्रस्तावित असून पैकी २१३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अपर पोलीस महासंचालक डॉ. निखील गुप्ता यांच्याबरोबर उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीतही उद्योजकांनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले. उद्योजकांबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे कुठे बसवायचे, त्याचा नियंत्रण कक्ष कुठे असेल, याबाबत विचार विनिमय करण्यात येणार असल्याचे आयुक्त कर्णिक यांनी सांगितले.