नाशिक – जिल्ह्यात १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे ४८ हजार ३२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका मका आणि कांद्याला बसला असून त्या खालोखाल भात, सोयाबीन, द्राक्ष, बाजरी, डाळिंबाचे नुकसान झाले.

सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही पावसाचे सत्र कायम राहिल्याने नुकसानीत वाढ होत असल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालावरून समोर आले आहे. १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत सुरगाणा, पेठ, सटाणा. कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, दिंडोरी, चांदवड, सिन्नर आणि नाशिक तालुक्यास अवकाळीने झोडपले. काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळला. याची परिणती पिकांच्या नुकसानीत झाल्याचे दिसून येते. अनेक भागात शेतांमध्ये पाणी साचले होते.

पावसामुळे सर्वाधिक म्हणजे १८ हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले. अनेक भागात लाल कांदा काढणीवर आला होता. पुढील काही दिवसांत तो बाजारात जाणार होता. तत्पुर्वीच पावसात तो सापडला. १२ हजार ९४ ३ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. तर १३०३ हेक्टरवरील कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले. उन्हाळ कांद्यासाठी महागडी बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी रोपे लावली होती. ती भुईसपाट झाली. यामुळे त्यांच्यासमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. ११ हजार ७९६ हेक्टरवरील भात, १६४२ हेक्टरवरील सोयाबीन, २५९ हेक्टरवरील बाजरी, १०४ हेक्टरवरील टोमॅटो, १८३ हेक्टरवरील भाजीपाला, १३२२ हेक्टरवरील द्राक्षे आणि २८९ हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी पाऊस सुरू असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते.

नैसर्गिक संकटांची सर्वाधिक झळ घाटमाथ्यावरील भागांना बसली. सुरगाणा तालुक्यात १५७ गावे (१३७२१ बाधित शेतकरी), सटाणा तालुक्यात १२६ गावे (३३३४९), कळवण १२० (१५६००), देवळा ४६ (२६०६१), दिंडोरी १२ (१४८), नासिक दोन (१२), त्र्यंबकेश्वर ११७ (३५२१), पेठ १३८ (८१२७), इगतपुरी १२६ (४०३०), निफाड चार (४२), सिन्नर (२२ (४४२), चांदवड ३१ (१४७८) असे ९०१ गावांतील तब्बल एक लाख आठ हजार ५३१ शेतकरी बाधित झाले. १२ तालुक्यांत अवकाळीने नुकसान झाले. तर मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यात नुकसान झाले नसल्याचे अहवालावरून दिसून येते.