लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: रावेर तालुक्यात आठ जूनला झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाल्याने गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. केळीबागांचेही मोठे नुकसान झाले. अनेक भागांत वीजतारा खांबासह तुटून पडल्या. प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे केले जात असून तालुक्यात सुमारे ५८ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
रावेर शहर व परिसरातील रमजीपूर, बक्षीपूर, केर्हाळे खुर्द, सिंदखेड, खानापूर, पिंप्री, अहीरवाडी, जुनोने, कर्जोद, अभोडा बुद्रुक, रसलपूर, मंगळूर, मोहगण आदी गावांमधील घरांचे आणि २७ गावांमधील केळीबागांचे मोठे नुकसान झाले. वादळी वार्यामुळे रावेर शहरात सुमारे १२० घरांवरील पत्रे उडून, तसेच घरांवर झाडे, वीजखांब पडून नुकसान झाले.
आणखी वाचा-नैसर्गिक नाल्यांतील अडथळे दूर करा, छगन भुजबळ यांची सूचना
तालुक्यातील २७ गावांमधील केळीबागांचे ५६ कोटी ६८ लाखांचे नुकसान झाल्याचा कृषी आणि महसूल विभागातर्फे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून, १० गावांमधील घरांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल प्रशासनाने व कृषी विभागाने शासनाकडे सादर केला आहे. नुकसानग्रस्त केळीबागा आणि घरांच्या पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात २७ गावांमधील एक हजार ६५२ शेतकर्यांचे एक हजार २५२ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा आडव्या झाल्या असून, सुमारे ५६ कोटी ६८ लाखांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. वीज वितरण कंपनीचे सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले.