नाशिक : औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन छोट्या, मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने हे पाणी कारखान्यांमध्ये शिरते. अपुरा पाणी पुरवठा, बंद पडलेले पथदीप, खड्डेमय रस्ते यावरून अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (आयमा) रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील खड्ड्यांची समस्या उद्योजकांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर मांडली. भुजबळ यांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी करुन खड्डे बुजविण्याची सूचना यंत्रणेला केली.
शहराप्रमाणे औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची बिकट स्थिती आहे. अंबड वसाहतीतील रस्त्यांची दयनीय अवस्था व मूलभूत सुविधांचा अभाव यावरून संतप्त उद्योजकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मूलभूत सुविधांअभावी उद्योजकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. शासनाने उद्योजकांना उद्योगांसाठी एमआयडीसीतर्फे भाडे तत्त्वावर भूखंड, महावितरणतर्फे वीज आणि इतर मूलभूत सुविधा पुरवल्या. परंतु, एमआयडीसीने महापालिकेशी करार करून रस्ते, पथदीप हे देखभाल करण्यासाठी महानगरपालिकेकडे वर्ग केले आणि पर्यायाने उद्योजकांना महानगरपालिकेकडे कर भरण्यास भाग पाडले. महापालिकेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या उद्योजकांना त्रास सहन करावा लागत असल्याकडे अलिकडेच आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते.
औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्याने परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर गेली आहे. मागील काही वर्षांत औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग वाढले. कामगारांची संख्या वाढली, वाहतूक देखील वाढली. परंतु, त्या तुलनेने रस्त्यांची अवस्था मात्र बदलली नाही. रुंदीकरण न झाल्याने छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळते. एक्सलो पॉईंट, गरवारे पॉईंट, डी.सेक्टर, ए.सेक्टर, के सेक्टर, बी.सेक्टर, डब्ल्यू, जी, एच सेक्टर आदी परिसर जणू मृत्यूचे सापळे झाल्याकडे आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि मूलभूत समितीचे कुंदन डरंगे यांनी लक्ष वेधले होते.
नैसर्गिक नाले बुजले गेल्याने औद्योगिक वसाहतील सांडपाण्याला निमंत्रण मिळते. परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. सांडपाणी प्रक्रिया केंद्र नसल्याने अथवा सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने रोगराईला निमंत्रण मिळते. वारंवार समस्या मांडूनही कार्यवाही होत नसल्याची उद्योजकांची तक्रार आहे. आयमा आणि निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते ट्री-मिक्स पद्धतीचे व्हावे, अशी मागणी केली होती. भुजबळ यांनी रस्त्यांची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष तथा नाशिक म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा संस्थेचे अध्यक्ष ललित बूब, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, हेमंत खोंड, दिलीप वाघ, राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींमधील समस्या उद्योजकांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर उद्योजकांसमवेत भुजबळ यांनी औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावे, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.