जळगाव –  जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर आधीच गलितगात्र अवस्था झालेल्या राष्ट्रवादीला (शरद पवार) अलिकडे अनेक दिग्गज सोडून गेले आहेत. तशात परभावातून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या पक्षाच्या बैठकांमध्ये चर्चा कमी आणि हमरीतुमरी जास्त होऊ लागल्याने पक्ष श्रेष्ठींनाही आता डोक्याला हात मारून घ्यावा लागला आहे.

जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी झाला होता, वातावरण निराशाजनक होते. तरी देखील पक्षाच्या अग्रगण्य नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खंबीरपणे उभे राहून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वरिष्ठ नेतेही निर्धास्त होते. मात्र, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे आणि कैलास पाटील यांनी शेकडो समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. या परिस्थितीतून सावरण्यासाठी जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय मेळावे घेण्यात आले. संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. अनेक दिग्गज सोडून गेल्यानंतरही पक्षाच्या ताकदीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दाखविण्यात आले.

प्रत्यक्षात, पडत्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना पूर्वीसारखा सन्मान शरद पवार गटात राहिला नसल्याचा आणि काही ठराविक पदाधिकारी आपली मनमानी करू लागल्याचा आरोप त्यानंतर होऊ लागला. त्यातूनच वाढलेल्या नाराजीतून काहींनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षांची वाट धरल्याचेही दिसून आले. शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी त्याच कारणातून ठाकरे गटात नुकताच प्रवेश केला होता. त्यानंतर गुरूवारी पार पडलेल्या बैठकीतही आदिवासी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यांची समजूत घालताना खुद्द पक्ष निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नाकीनऊ आले.

नागपूरहून निघालेली मंडल यात्रा एक सप्टेंबरला जळगावमध्ये दाखल होत आहे. त्या संदर्भात तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाची बैठक आयोजित केली होती. प्रत्यक्षात, मूळ विषय बाजुलाच राहिला. पदाधिकाऱ्यांमधील वादामुळे बैठकीचे वातावरण तापले. या वेळी माजी खासदार ईश्वर जैन, प्रदेश सरचिटणीस ॲड. रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महानगर अध्यक्ष एजाज मलीक, युवक अध्यक्ष रिकू चौधरी, महिला अध्यक्षा मंगला पाटील, युवती आघाडीच्या कल्पिता पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, संतोष चौधरी, संग्रामसिंह सुर्यवंशी, विकास पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.