लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : सीएनजी गॅसच्या अनियमित पुरवठ्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील पंपांवर वाहनधारकांना हे इंधन मिळणे जिकिरीचे झाले आहे. दुसरीकडे ‘सीएनजी उपलब्ध नाही‘ हा फलक वारंवार लावणे भाग पडत असल्याने पंपचालकही त्रस्तावले आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या कार्यशैलीस वैतागलेल्या पंपचालकांनी सीएनजीचा सुरळीत पुरवठा न झाल्यास २६ एप्रिलपासून जिल्ह्यात विक्री बंद करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत सीएनजीचे एकूण ३५ ते ४० पंप आहेत. यातील १४ हे केवळ शहरात आहेत. यातील एकही पंप २४ तास सुरू ठेवता येईल, इतका सीएनजी पुरवठा होत नाही. कधी दोन-तीन तास तर कधी एक दिवसाआड सीएनजी पुरवठा होतो. परिणामी या सर्व पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागतात. अशा स्थितीत एमएनजीएल कंपनीचे शहरातील तीन आणि मालेगावचा एक हे स्वत:चे चार पंप मात्र सुरळीत सुरू असतात, याकडे नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर असोसिएशनने लक्ष वेधले आहे. सीएनजीचा तुटवडा असता तर हे पंपही अधूनमधून बंद असणे आवश्यक होते. तसे घडत नाही. ग्राहकांचा पेट्रोल पंपावरील सीएनजी विक्रीचा विश्वास उडाला पाहिजे आणि त्यांनी कंपनीच्या पंपावर इंधन भरण्यासाठी यायला हवे, असा कंपनीचा प्रयत्न असल्याचा आक्षेप संघटनेने नोंदविला. पंपावर सीएनजी नसल्याने ग्राहकांच्या रोषाला चालक आणि कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
पुरवठ्याच्या वेळा माहिती नसल्याने कर्मचाऱ्यांना बोलावून बसून वेतन द्यावे लागते. वीज देयक वेळेवर न मिळणे, केवळ कॉम्प्रेसरवर पंप चालविणे आणि अन्य माध्यमातून पंपधारकांचे नुकसान होत आहे. अपुऱ्या सीएनजी पुरवठ्यामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांमधील वाद ही नित्याची बाब झाली आहे. दररोज किमान १० तास सर्व सीएनजी पंपांना पुरवठा न झाल्यास त्याची विक्री थांबविण्याच्या विचाराप्रत पंपचालक आले आहेत. संघटनेने एमएनजीएलला पाठविलेल्या निवेदनात हे स्पष्ट करण्यात आले आहे.
सीएनजीच्या गोंधळामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. आम्ही देखील पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपचालक म्हणून होरपळून निघालो आहोत. एमएनजीएलला वारंवार सांगूनही यात सुधारणा होत नसल्याने आम्ही आता २५ एप्रिलपर्यंंत रोज निदान १० तास सुरळीत सीएनजी पुरवठा न झाल्यास २६ एप्रिलपासून सीएनजी विक्री जिल्ह्यात बंद करण्याचा इशारा दिला आहे. -विजय ठाकरे (अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर असोसिएशन)
नाशिकमध्ये सध्या सव्वा ते दीड लाख मीटर क्युब सीएनजी टँकरद्वारे पुरवठा केला जातो. दाभोळ आणि गुजरात टर्मिनलवरून होणारा पुरवठा सर्वस्वी पुरवठा व्यवस्थेवर अवलंबून आहे. यात मध्यंतरी काही अडचणी आल्याने वितरण व्यवस्थेत व्यत्यय आले. लवकरच हे प्रश्न सोडविले जातील, असे एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.