जळगाव : शहरातील विमानतळाला राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळाचा मान मिळाला असून, केंद्र सरकारने येथील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी सुमारे ३० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील सेवांचा आणखी विस्तार करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.

जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद, पुणे आणि मुंबई या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. तसेच येथे हवाई प्रशिक्षण केंद्रही कार्यरत आहे. भविष्यात अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे विमानतळ अत्यंत सोयीचे ठरणार आहे. सध्या मात्र विमानतळाचे कामकाज केवळ एकाच पाळीत मर्यादित असून, आवश्यक भौतिक सुविधा अपुऱ्या असल्याने प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी तांत्रिक तसेच आर्थिक साहाय्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्याकडे केली होती. याशिवाय, खासदार वाघ यांनी शहरातील विमानतळाचा विस्तार, पायाभूत सुविधा वाढविणे आणि आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय नागरी विमानन मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

खासदार वाघ यांच्या प्रयत्नांमुळे आता जळगाव विमानतळावर दोन एटीआर ७२ आणि एक लेगसी ६५० विमानाची पार्किंग होऊ शकेल, अशा ॲप्रनचा विस्तार केला जाणार आहे. तसेच आधुनिक सोयी सुविधायुक्त टर्मिनल इमारत, १५० प्रवाशी क्षमतेची बैठक व्यवस्था, टर्मिनल इमारतीसमोर १०० मोटारींचा वाहनतळ, आगमन सभागृहात प्रवाशांनी बरोबर आणलेले सामान जमा करण्यासाठी कन्व्हेयर बेल्ट, वैद्यकीय तपासणी कक्ष, अतिरिक्त चेक-इन काऊंटर, खाद्य पदार्थांची दुकाने तसेच बालसंगोपन कक्षाची निर्मिती केली जाणार आहे.

सध्या जळगाव विमानतळावर स्वतंत्र माल वाहतूक (कार्गो) विमानसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशी विमानांद्वारे मर्यादित प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. नवीन कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना केळीसह इतर शेती मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. त्यादृष्टीनेही खासदारांनी पाठपुरावा सुरू केला आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची कुंभमेळा पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक मंगळवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली. त्यात प्रामुख्याने जळगाव विमानतळावरील सध्या उपलब्ध असलेल्या सुविधा, एअरलाईन्स कनेक्टीव्हीटी आणि विस्तारीकरण प्रस्ताव, यावर चर्चा करण्यात आली.

बैठकीत जळगावहून जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि विमानतळाचे संचालक हर्ष त्रिपाठी हे सहभागी झाले होते. या प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील रेल्वे वाहतूक व सुविधा विस्तार तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि इतर विभागांच्या पूर्व तयारीचा आढावा सुद्धा घेण्यात आला.