जळगाव : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादीला (शरद पवार) सोडचिठ्ठी देऊन अलिकडेच सत्ताधारी अजित पवार गटात प्रवेश केला असतानाही त्यांच्यामागील शुक्लकाष्ट संपलेले नाही. जळगाव जिल्हा बँकेतून घेतलेल्या १० कोटींच्या कर्ज प्रकरणात पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्जाची संपूर्ण रक्कम तत्काळ एक रकमी वसूल करण्यात यावी, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
माजी मंत्री देवकर हे २०२१-२२ मध्ये जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. त्याच काळात ते श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचेही अध्यक्ष होते. बँक नियमन कायदा १९४९ चे कलम २० अन्वये कोणत्याही पदाधिकाऱ्यास ते संचालक अथवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही संस्थेस कर्ज मंजूर करण्यास प्रतिबंध आहे. तरीही देवकर यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या नावे १० कोटींचे कर्ज जिल्हा बँकेतून उचलले.
त्यामुळे देवकर यांनी पदाचा गैरवापर करत स्वतःच्या संस्थेच्या नावे कर्ज मंजूर करून घेतल्याची तक्रार झुरखेडा (ता.धरणगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक एस. जी. पाटील यांनी सहकार विभागाकडे केली होती. त्याअनुषंगाने नाशिक येथील सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकांना सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेवर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यांच्या मार्फत धुळे येथील सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी आपला चौकशी अहवाल सादर केला आहे.
अहवालात गुलाबराव देवकर यांनीं जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळास दोन टप्प्यात सुमारे १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचे म्हटले आहे. १० कोटींचे कर्ज दिल्यानंतर त्या मोबदल्यात कर्जदार संस्थेच्या मालमत्तेवर रजिष्टर गहाणखत बोजा बसविण्यात आला आहे.
कर्ज घेतल्यापासून संस्थेकडून नियमित कर्जफेडही सुरू आहे. मात्र, नाबार्डच्या तपासणी अहवालातील शेऱ्यानुसार कर्जदार संस्थेला कर्ज देताना बँक नियमन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे नाबार्डच्या तपासणी अहवालातील शेऱ्यास अधीन राहून देवकर यांच्या शैक्षणिक संस्थेने घेतलेले कर्ज तत्काळ एक रकमी वसूल करणे आवश्यक असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट केले आहे.
जळगाव जिल्हा सहकारी बँकेतून आमच्या शैक्षणिक संस्थेने घेतलेल्या कर्ज प्रकरणाचा चौकशी अहवाल काय आहे, त्याची मला अजून माहिती नाही. अहवालाची प्रत हातात पडल्यावर पुढील प्रतिक्रिया देता येईल. – गुलाबराव देवकर (माजी पालकमंत्री, जळगाव)