जळगाव – सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची मोठी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून बऱ्याच विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी काही रेल्वे गाड्या या जळगावसह भुसावळ येथून मुंबई जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीच्या ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दिवाळी तसेच छट पुजेनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने यापूर्वी ९४४ विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता १८२ विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील काही गाड्यांना भुसावळ आणि जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवसात लांब पल्ल्याच्या बऱ्याच रेल्वे गाड्या तिकडून भरून येतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. गर्दीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. ही स्थिती लक्षात घेता दिवाळी आणि छट पुजेनिमित्त सुरू करण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळू शकेल.

मध्य रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस–दानापूर–लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेच्या एकूण ४० फेऱ्या होतील. ०१०१७ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २७ सप्टेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल. ०१०१८ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २९ सप्टेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी दानापूर येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस–मऊ–लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या एकूण ४० फेऱ्या होतील. ०११२३ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ०५.३५ वाजता पोहोचेल. ०११२४ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २८ सप्टेंबर ते दोन डिसेंबर या कालाधीत प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी मऊ येथून ०७.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.२० वाजता पोहोचेल.

याशिवाय, लोकमान्य टिळक टर्मिनस–बनारस–लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या ४० फेऱ्या होतील.०१०५१ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २४ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी आणि गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे तिसऱ्या दिवशी ०१.१० वाजता पोहोचेल. ०१०५२ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २६ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी बनारस येथून ०६.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.४० वाजता पोहोचेल. वरील तिन्ही गाड्यांना भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिन्ही विशेष गाड्यांना प्रत्येकी दोन वातानुकूलित द्वितीय, आठ वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, सहा सामान्य द्वितीय आणि एक सामान्य द्वितीय आसन व्यवस्था असणार आहे.