जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर भाजप ॲक्शन मोडवर आली असून, बहुमतासाठी महाविकास आघाडीला हादरे देण्याची रणनीती मंत्री गिरीश महाजन यांनी आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चोपड्यात राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसला मोठा धक्का देण्यात भाजपला यश आले आहे.
साकेगाव (ता. भुसावळ) येथे भाजपची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आणि धोरणात्मक नियोजनावर मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चा केली. बैठकीत जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पक्षीय कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्ये जोमाने काम करण्याचे आवाहन केले गेले. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास पक्षाला अधिक बळकटी येईल. आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा विजय सुनिश्चित होईल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार सुरेश भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेरचे आमदार अमोल जावळे, भाजप जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीत चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष जीवन चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे चोपडा तालुक्यात पक्ष संघटन मजबूत होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला लाभ होईल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या चोपडा मतदारसंघावर गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या शिंदे गटाची सत्ता असताना, भाजपने आपले प्रस्थ वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी ठाकरे गटाकडून चोपड्याची निवडणूक लढणारे उमेदवारी प्रभाकर सोनवणे यांनीही अलीकडेच भाजपमध्ये घरवापसी केली आहे. एकूण चित्र लक्षात घेता चोपड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला शह देण्याची पुरेपूर तयारी भाजपने केल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, पक्षाला पुन्हा विजयाच्या दिशेने नेण्यासाठी महाजन यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांबाबत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युती होणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तरीदेखील, महाजन यांनी आगामी निवडणुकांचा बारकाईने अभ्यास करून कार्यक्षम, जनतेशी घट्ट नाते राखणारे आणि नव्या ऊर्जा व विचारसरणीचे कार्यकर्ते पुढे आणण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या धोरणामुळे भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाची लाट उसळली आहे.
