जळगाव – जिल्ह्यातील गुढे (ता. भडगाव) येथील मूळ रहिवाशी असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला कर्तव्यावर असताना पश्चिम बंगालमध्ये शनिवारी वीरमरण प्राप्त झाले. स्वप्नील सुभाष सोनवणे (३९) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

जवान सोनवणे हे सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगालमध्ये जी.डी. कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. बांगलादेशच्या सीमेवरील फ्लड लाईट खांब क्रमांक १७ दुरुस्तीचे काम शनिवारी करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. आणि ते सरळ खाली सिमेंट काँक्रिटच्या तळावर जाऊन पडले. त्यांना तत्काळ सीमा सुरक्षा दलाच्या रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यांसह बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रात्री साडेआठ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे मृत घोषित केले. नेमके रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याने कुटुंबियांना शोक अनावर झाला. संपूर्ण गुढे गावावर शोककळा पसरली. जवान सोनवणे यांच्या मागे पत्नी कविता, पाच वर्षाची मुलगी योगेश्वरी, तीन वर्षांचा मुलगा रूद्राक्ष तसेच विधवा आई आणि विवाहित बहीण, असा परिवार आहे.

जवान सोनवणे यांचे पार्थिव घेऊन सीमा सुरक्षा दलाचे जवान विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोहोचतील. त्यानंतर मंगळवारी सकाळी १० वाजता गुढे येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. या संदर्भात जळगाव येथील पोलीस प्रशासनाला सीमा सुरक्षा दलाने माहिती दिली आहे. स्वप्नील सोनवणे हे २०१४ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. त्यांचे कुटुंब सध्या चाळीसगाव येथे वास्तव्यास आहे.