जळगाव – पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यापासून जळगावमधील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, नव्याने तयार झालेल्या बाह्यवळण महामार्गावरील पथदिव्यांच्या खांबांमुळे आता पुन्हा अपघाताचा धोका वाढल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बाह्यवळण महामार्ग अस्तित्वात येण्यापूर्वी वाहनधारकांना पाळधीहून तरसोद जाण्यासाठी जळगाव शहरातील जुन्या महामार्गावरून किमान पाऊण तासांचा वेळ लागत असे. मात्र, बाह्यवळण महामार्गामुळे पाळधी ते तरसोद प्रवासाची वेळ आता २० मिनिटांवर आली आहे. वाहनांच्या इंधन खर्चाची मोठी बचत त्यामुळे होत आहे. विशेष म्हणजे जळगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आणि अपघाताचा धोका बऱ्यापैकी कमी झाला आहे. बाह्यवळण महामार्गालगत सेवा रस्ते कार्यान्वित झाल्यानंतर नव्याने विकसित होणाऱ्या जळगाव शहराची तसेच परिसरातील गावांची मोठी सोय झाली आहे. उड्डाणपुलांच्या खालून जाणारे ग्रामीण भागातील रस्ते बाह्यवळण महामार्गाशी जोडले गेले आहेत. भुसावळ किंवा एरंडोल-धरणगावकडे जाण्यासाठी कमी अंतराची सोय त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांची झाली आहे.

दरम्यान, बाह्यवळण महामार्गाचे काम करताना आव्हाणे तसेच ममुराबाद, आसोदा आणि तरसोद येथे मोठे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने दुतर्फा पथदिवे बसविण्याचे काम केल्याने रात्रीच्या अंधारात महामार्ग उजळून निघत आहे. कंत्राटदाराने उड्डाणपुलांच्या खालून जाणाऱ्या रस्त्यांवरही उजेड असावा म्हणून पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. शहरातील जुन्या महामार्गावर पथदिव्यांच्या देखभालीवर दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च होत असला तरी अंधाराचे साम्राज्य कायम असते. त्या तुलनेत पाळधी ते तरसोद दरम्यानच्या नवीन बाह्यवळण महामार्गावरील पथदिव्यांचा झगमगाट वाहनधारकांसाठी सध्या दिलासादायक ठरला आहे.

नवीन प्रकाश योजनेमुळे बाह्यवळण महामार्गालगतचा परिसर अधिक आकर्षक भासत आहे. ठिकठिकाणच्या उड्डाणपुलांवर आणि खाली देखील पथदिवे बसविण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, ममुराबाद येथील उड्डाणपुलाखाली पथदिव्यांचे खांब रस्त्यांच्या बरोबर मध्यभागी उभे करण्यात आल्याने दोन्ही बाजुने अपघातप्रवण क्षेत्र आता निर्माण झाले आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी उभे केलेले आणि अपघाताला निमंत्रण देणारे पथदिवे तातडीने हटवून ते बाजुला बसविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील गावांमधील नागरिकांनी केली आहे.