जळगाव : पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यापासून शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बाह्यवळण महामार्गावर उभारलेल्या उड्डाणपुलांखालून जाणाऱ्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आता विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.
बाह्यवळण महामार्ग सुरू होण्यापूर्वी पाळधी ते तरसोद प्रवासासाठी वाहनचालकांना जळगाव शहरातील जुन्या महामार्गावरून जावे लागत असे. ज्यासाठी किमान पाऊण तासाचा वेळ लागत होता. मात्र, नव्या बाह्यवळण महामार्गाच्या वापरामुळे हा प्रवास आता केवळ २० मिनिटांत पूर्ण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा मौल्यवान वेळ आणि इंधन या दोन्हींची मोठी बचत होत आहे. याशिवाय, शहरातील वाहतूक कोंडी कमी झाली असून अपघातांची शक्यता देखील घटली आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त केले आहे.
बाह्यवळण महामार्गालगतच्या आव्हाणे, कानळदा, ममुराबाद, आसोदा आणि तरसोद या गावांकडे जाण्यासाठी ठिकठिकाणी मोठे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्या लगत सेवा रस्ते कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील गावांना बाह्यवळण महामार्गाचा मोठा फायदा झाला आहे.
उड्डाणपुलांच्या खालून जाणारे ग्रामीण रस्ते आता थेट बाह्यवळण महामार्गाशी जोडले गेल्याने ग्रामीण भागाचा संपर्क अधिक सुलभ झाला आहे. भुसावळ तसेच एरंडोल-धरणगावच्या दिशेने जाण्यासाठी कमी अंतराचा आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी झाले आहे. या सुविधेमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.
दरम्यान, जळगावला विकासाचे नवे स्वप्न दाखवणार्या पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर पथदिवे बसविण्याचे काम आता पूर्णत्वास आहे. परिणामी, बाह्यवळण महामार्ग रात्रीच्या वेळी उजळून निघत आहे. नवीन प्रकाश योजनेमुळे बाह्यवळण महामार्गालगतचा परिसर अधिक आकर्षक भासत आहे. याशिवाय वाहनधारकांना अधिक सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळत आहे.
उड्डाणपुलांच्या खाली सुद्धा प्रकाश योजना केली गेली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात वाहनधारकांना त्याचा मोठा उपयोग होत आहे. याशिवाय, उड्डाणपुलांखालून ये-जा करणाऱ्या लहान-मोठ्या वाहनांचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आता दोन्ही बाजुला बहिर्गोल आरसे बसवले गेले आहेत. जेणेकरून वाहनधारकांची उड्डाणपुलाखालून जाताना उडणारी तारांबळ बरीच कमी झाली आहे.
जळगावच्या विकासाला नवी दिशा
बाह्यवळण महामार्गामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव उत्तर दिशेला उभे राहण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. शहरालगतची गावे देखील या विकास प्रक्रियेत सामील होत असल्याने त्यांची सुद्धा किंमत वाढली आहे. भविष्याचा वेध घेऊन अनेक नवे प्रकल्प बाह्यवळण महामार्गालगतच्या शेतांमध्ये सुरू होत असल्याने परिसराचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्राचेही या भागाकडे लक्ष वेधले गेले आहे. याचबरोबर बाह्यवळण महामार्ग जळगाव विमानतळाच्या शेजारून थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भविष्यातील प्रगतीला आणखी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
