जळगाव – पीक नुकसान अनुदान वाटपासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेतून सुमारे एक कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या महसूल सहायकाच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता संबंधित लिपिकाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच अपहाराच्या रकमेची वसुली देखील सुरू झाली आहे.
अमोल भोई असे संशयित महसूल सहायकाचे नाव आहे. पाचोरा येथे तहसील कार्यालयात कार्यरत असताना भोईने स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतूने २०२२-२३ आणि २०२४-२५ या दोन वर्षांच्या कालावधीत पाचोरा तालुक्यातील काही गावांमधील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बनावट याद्या तयार केल्या. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे एक कोटी २० हजार १३ हजाराची रक्कम जमा केली. हा सर्व प्रकार केल्यावर भोईने ज्यांच्या नावावर पीक नुकसान भरपाईचे पैसे जमा केले होते, त्या शेतकऱ्यांशी नंतर वैयक्तिक संपर्क साधला. तसेच संबंधितांकडून त्यांच्या नावावर जमा झालेले पैसे ताब्यात घेतले.
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल सहायक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार विजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२-२३ आणि २०२४-२५ या दोन वर्षात ३४७ बाधित शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम आली होती.
मात्र, बनावट याद्या तयार करुन ही रक्कम पात्र नसलेल्या तसेच शेती नावावर नसलेल्या व्यक्तींच्या नावावर टाकण्यात आली. पुढे बनावट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर काढून ती स्वतःसाठी वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत बनावट दस्ताऐवज तयार करून ते पंचनाम्यात जोडण्यात आले आहेत.
दरम्यान, पाचोऱ्याचे तहसीलदार बनसोडे यांनी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर अमोल भोई याने पीक नुकसान अनुदानाची रक्कम आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जमा केली होती, त्या २२५ जणांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्या बँक खात्यांवर भोई याने जमा केलेली अनुदानाची रक्कम तातडीने तहसील कार्यालयात जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानंतर पाचोरा तालुक्यातील अनेकांनी कारवाईच्या भीतीने तहसील कार्यालयात त्यांच्या नावे जमा झालेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी धावपळ देखील केली आहे. पीक अनुदान वाटपासाठी उपलब्ध झालेल्या संपूर्ण रकमेची वसुली न झाल्यास लिपीक अमोल भोई याच्या मालमत्तेवर बोजा चढविणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.