जळगाव – राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेतील २२० कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, संचालक मंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेवर बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

जिल्हा सहकारी बँकेने गेल्या वेळी २५० हून अधिक जागांची भरती पारदर्शकपणे आणि नामांकित कंपनीच्या माध्यमातून केली होती. आणि त्यावेळी एकही तक्रार भरती प्रक्रियेविषयी झाली नव्हती. तशीच प्रक्रिया आताही राबविण्यात यावी, असे आमदार खडसे यांनी म्हटले आहे.

राज्यभरातील जिल्हा सहकारी बँकांमधील सरळसेवा भरती प्रक्रियेत संचालक मंडळाचा हस्तक्षेप रोखण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्षपणे करण्यासाठी येत्या काळात आयबीपीएस किंवा टीसीएस या सारख्या नामांकित बाह्य संस्थांमार्फतच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामुळे राजकीय दबाव किंवा व्यक्तिगत हस्तक्षेपाला आळा बसून पात्रतेनुसार उमेदवारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नांदेडसह बऱ्याच जिल्ह्यात तसे प्रकार उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर, आमदार खडसे यांनी जळगाव जिल्हा बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सध्याच्या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.

टीसीएस किंवा आयबीपीएस यासारख्या कंपन्यांच्या माध्यमातूनच गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात यावी, अशीही आग्रही मागणी आमदार खडसे यांनी केली आहे. जिल्हा सहकारी बँकांमधील भरती प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शक व्हावी, यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या आदेशानुसार सरळ सेवा भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी सहकार विभागाने सात नामांकित संस्थांना मान्यता दिली होती. या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये आयबीपीएस, टीसीएस, एमकेसीएल यासह इतर चार संस्थांचा समावेश आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

अजित पवार गट अडचणीत

शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली जिल्हा सहकारी बँकेची नवी पेठेतील ऐतिहासिक शाखा ‘दगडी बँक’ म्हणून ओळखली जाते, ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शतकोत्तर परंपरा लाभलेली ही वास्तू विकण्याचा घाट विद्यमान संचालक मंडळाने घातल्याने बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनीही त्यास तीव्र विरोध केला आहे. त्यानंतर त्यांनी आता नोकर भरतीच्या मुद्द्यावरून जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला धारेवर धरले आहे. अध्यक्ष संजय पवार यांच्यासह बरेच संचालक हे अजित पवार गटाचे असताना खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अर्थात, अध्यक्ष वगळता एकाही संचालकाने अद्याप खडसेंना प्रत्युत्तर दिलेले नाही.