जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून महायुतीचे तिन्ही घटक पक्ष जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतही शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. परंतु,, काँग्रेस पक्षाचे नेमके काय चालले आहे, हे समजणे कठीण झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीची स्थिती फार चांगली नव्हती. मात्र, जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीने जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत उतरण्याची तयारी केली. ज्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीनच सरकली. परंतु, महाविकास आघाडीची खेळी हाणून पाडण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी रात्रीतून चक्र फिरवले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक सदस्याच्या मदतीने भाजपने जिल्हा परिषदेवर आपला झेंडा रोवला. खडसे आणि महाजन यांच्या खेळीपुढे महाविकास आघाडीचे सगळे डावपेच निष्प्रभ ठरले.
जिल्हा परिषदेवर सत्ता आल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड आणखी घट्ट करण्याच्या हालचाली भाजपने नंतरच्या काळात वाढवल्या. गेल्या वर्षभरात पार पडलेल्या लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपने शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीचा (अजित पवार) हात हातात घेऊन निर्विवाद बहुमत सिद्ध केले. सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसची आणखी गलितगात्र अवस्था झाली. अचानक वाऱ्याची दिशा बदलल्याने तिन्ही पक्षांना मोठी गळती लागली. नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे मेळाव्यांमध्ये उद्भवलेले वाद चव्हाट्यावर आले. त्यातूनही सावरण्याचा प्रयत्न विशेषतः शरद पवार गट आणि ठाकरे गट करताना दिसले. परंतु, काँग्रेसमध्ये जणू लढण्याचे बळच शिल्लक राहिले नाही.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी काँग्रेसने नवीन प्रदेश कार्यकारिणीवर जळगाव जिल्ह्यातील तब्बल सात जणांची नियुक्ती ऑगस्टमध्ये केली. त्यापैकी तीन जणांची प्रदेश उपाध्यक्ष, दोन जणांची सरचिटणीस आणि इतर दोन जणांची सचिव पदावर वर्णी लावली गेली. प्रतिभा शिंदे यांची तर प्रदेश उपाध्यक्षपदावर दुसऱ्यांदा नियुक्ती झाली. परंतु, शिंदे यांनी आठच दिवसात काँग्रेसचा राजीनामा देत राष्ट्रवादीत (अजित पवार) आपल्या हजारो समर्थकांसह प्रवेश केला. अलीकडे पक्षाला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी फार काही कोणी सध्या प्रयत्न करताना दिसतही नाही. तशात, कोणीतरी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेली ध्वज, रूमाल आणि इतरही बरेच कापडी साहित्य रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्याकडे अद्याप काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याचे लक्ष गेलेले नाही.
