जळगाव – शहरात नरक चतुर्दशीच्या दिवशी एकीकडे दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम साजरे होत असताना, दुसरीकडे सायंकाळी ‘दिवाली सुफी नाईट’ नावाचे वेगळे कार्यक्रमही आयोजित केले गेले. ज्यामध्ये कमरेला बंदुक लावून समोरच्या गायकावर नोटा उधळणाऱ्या एका तरूणाच्या विरोधात गुन्हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील पद्मालय सभागृहात सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री १० या कालावधीत दिवाली सुफी नाईट नावाचा मध्य प्रदेशातील गायक शफी मस्तान यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात पीयूष मन्यार हा तरूण स्वसंरक्षाणासाठी मिळालेली आणि परवाना असलेली बंदूक नियम माहिती असतानाही कमरेला लावून ती लोकांना स्पष्टपणे दिसेल, असा शर्ट परिधान करून स्टेजसमोर नाचत होता. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बंदूक कमरेला लावून मध्य प्रदेशातील गायकासमोर तो पैशांची उधळण करत होता.

दरम्यान, पीयूष मन्यार दिवाली सुफी नाईट कार्यक्रमात कमरेला बंदूक लावून गायकावर पैशांची उधळण करतानाचे चित्रण असलेली “कमर में पिस्तौल, हाथ में नोट- जलगाँव की रात पुलीस हॉल में व्हीआयपी पार्टी : नोट और पिस्टल व्हायरल”, अशा आशयाची बातमी बुधवारी पाडव्याच्या दिवशी समाज माध्यमावर व्हायरल झाली. त्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली.

व्हायरल झालेली चित्रफित पाहुन जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अखेर पीयूष मन्यार याच्या विरोधात बुधवारी रात्री उशिरा शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३० आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाल देशमुख पुढील तपास करीत आहेत.

फटाके फोडण्यावरून दाम्पत्यावर हल्ला

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून दाम्पत्याला चौघांनी शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच धारदार चॉपरने चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केले. भांडण सोडविण्यास गेलेल्या दोन व्यक्तींवर देखील संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला करून दुखापत केली. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून फटाके फोडण्याच्या कारणावरून त्यांच्या घरासमोरील ज्ञानेश्वर पाटील, खुशाल बारी, बापू मिस्तरी, अमोल पवार (सर्व रा. शिरसोली) यांनी मुकेश पाटील (३४) यांना जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कैलास मिस्तरी याने त्याच्या हातातील धारदार चॉपरने चेहऱ्यावर वार केला. तक्रारदार महिला भांडण सोडविण्यास गेली असता, तिलाही संशयितांनी मारहाण करून शिवीगाळ केली.