Ganesh Visarjan 2025: जळगाव – महानगरपालिकेतील मानाच्या गणपतीची आरती आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते झाल्यानंतर शनिवारी सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणुकीला शिवतीर्थ मैदानावरून सुरूवात झाली. टाळ, मृदंग, ढोल आणि ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत गणेश भक्तांमध्ये अपूर्व उत्साह दिसून आला.

महापालिकेतील मानाच्या गणपती पाठोपाठ शहरातील सर्वच गणेश मंडळे गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, महापालिका इमारत, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरुजी चौक, भिलपुरा चौक, सराफ बाजार, पांडे डेअरी चौक, सिंधी कॉलनी आणि शिरसोली नाका, या मार्गे मेहरूण तलावाकडे रवाना झाले.

गणेश मंडळांच्या महामंडळाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार रात्री आठ वाजता संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकाच वेळी महाआरती केली जाणार आहे. ज्या ठिकाणी मंडळे उभी असतील तिथेच आरती करून पुढील मार्गक्रमण सुरू होईल. वाहतुकीस अडथळा होऊ नये आणि मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी, यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. काही मार्गांवर लहान-मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीत अडथळा येऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून यापूर्वीच करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रत्येक गणेश मंडळास दोन गणरक्षक नेमून दिले असून, कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून समन्वय राखण्यासाठी सर्व गणरक्षक कार्यरत राहतील.

महापालिकेने गणेश भक्तांच्या मदतीसाठी आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केला आहे. जयप्रकाश नारायण चौक येथे एक वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्यात आले आहे. तिथे १५ डॉक्टर, रूग्णवाहिका आणि औषधांची उपलब्धता आहे. तसेच महिलांसाठी मार्गावरील हॉटेल्सची स्वच्छतागृहे खुली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरूषांसाठी स्वतंत्र मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे.

यंदा मेहरुण तलावावरील गणेश घाट आणि सेंट टेरेसा शाळेजवळील काठावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी सात तराफे, सहा क्रेन आणि एक बोट तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सराईतपणे पोहणारे १०० जीव रक्षक तैनात राहणार आहेत. लाठी शाळा, पांझरापोळ शाळा, पिंप्राळ्यातील शाळा, निमखेडी गट क्रमांक १०१ येथील पाण्याची टाकी, नाभिक समाज सभागृह आणि शिवाजीनगर येथे मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेने ४५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्माल्य संकलनासाठी महापालिका कर्मचारी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, विविध गणेश मंडळांचे स्वयंसेवक आणि गणेश भक्त सक्रिय सहभाग नोंदविताना दिसत आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसाठी तीन पोलीस उपअधीक्षक, १० उपनिरीक्षक, १०० अंमलदार, एक एसआरपीएफ कंपनी आणि सुमारे १८०० गृह रक्षक दलाचे जवान (महिला आणि पुरुष) तैनात करण्यात आले आहेत. स्वतः पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी जातीने लक्ष ठेवून आहेत. गणेश मंडळांचा परिसर, मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर करून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर पोलीस प्रशासनाचा भर आहे.