जळगाव : राज्य शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात जळगाव जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत विविध संवर्गांत उत्कृष्ट कामगिरी करुन प्रथम, द्वितीय स्थान पटकाविले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात जळगावने राज्यात द्वितीय स्थान पटकावले. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालकांना महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात महाआवास अभियान-२०२३-२४ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होत आहे. कार्यक्रमात महाआवास अभियान-२०२१-२२ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना महाआवास अभियान पुरस्कार व महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

हेही वाचा : जायकवाडीला पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध; फळबागा, शेती उद्ध्वस्त होण्याची भीती

महाआवास अभियान पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्यात जळगावने द्वितीय स्थान पटकावले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनांतर्गत महाआवास अभियान विशेष पुरस्कारांत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात जळगावने द्वितीय तर, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात प्रथम स्थान मिळवले आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात जळगावने तृतीय स्थान पटकावले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत बहुमजली इमारत बांधण्यात तृतीय तर, लाभार्थ्यांना जागा करून देण्यासाठी लँड बँक तयार करण्यात जिल्ह्याने द्वितीय स्थान मिळवले आहे.

हेही वाचा : धुळ्यातील सामूहिक विवाह सोहळ्यात २२ जोडपी सहभागी

किमान १० टक्के घरकुल बांधकामात फरशी-लादी, रंगरंगोटी, किचन गार्डन- परसबाग, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा साधने व नेट बिलिंग आदींचा वापर करून तयार केलेल्या घरकुलांत जिल्ह्याने द्वितीय स्थान मिळवले आहे. अधिकारी- कर्मचारी गटात राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माणचे जळगाव जिल्हा प्रोग्रामर विवेक गोहील यांनी द्वितीय, जिल्हा डेटा एंट्री ऑपरेटर गटात सुमित बोरसे, तालुकास्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर गटात सतीश पवार (पारोळा) यांनी चौथा व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गटात करण पाटील (चाळीसगाव) यांनी द्वितीय स्थान मिळवले.

हेही वाचा : ग्रामीण भागातील मंदिर परिसराचाही आता विकास, नाशिक जिल्ह्यासाठी तीन कोटींच्या निधीला मंजुरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्ह्याने महाआवास योजना पुरस्कारांत बाजी मारली आहे. महसूल शाखेचे तहसीलदार पंकज लोखंडे यांची मेहनत व सकारात्मक पाठपुराव्यामुळे गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ६६० भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध झाली आहे.” – आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)