जळगाव – यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा जिल्ह्यातील हतनूर धरणाचे ४६ पैकी १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीपात्रात सुमारे २० हजार क्यूसेक पेक्षा जाास्त पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीच्या काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसानंतर पाण्याची आवक वाढल्याने आठवडाभरापासून हतनूर धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. दरम्यान, विदर्भात तसेच हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस झाला. पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. हतनूर धरणातील जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुकवारी सायंकाळी ४६ पैकी १२ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. पाण्याची आवक वाढल्याने रात्री १० वाजता आणखी चार दरवाजे उघडावे लागले. मात्र, शनिवारी सकाळपर्यंत आवक थोडी कमी झाल्याने सहा दरवाजे बंद करावे लागले. शनिवारी सकाळी हतनूरचे १० दरवाजे एक मीटरने उघडे असताना, सांडव्यातून २० हजार १३० क्सूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असताना, तापी नदीवर शेळगाव येथे उभारलेल्या बॅरेजमध्येही पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाने या बॅरेजचे सात दरवाजे दोन मीटरने उघडले असून, सांडव्यातून सुमारे ५२ हजार ७६५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हतनूर धरणासह शेळगाव बॅरेजमधून एकाच वेळी पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर, तापी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरून वाहताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असतानाही हतनूरमध्ये सद्यःस्थितीत ६२.०६ टक्के पाणी साठा आहे. पाण्याची आवक कमी झाल्यास हतनूरमधील विसर्ग आणखी कमी केला जाऊ शकतो, असे कार्यकारी अभियंता एस. जी. चौधरी यांनी लोकसत्ताला सांगितले.