जळगाव – जिल्ह्यातील जामनेर शहरात प्रवासी वाहनात अवैधरित्या घरगुती गॅस भरताना पाच ते सहा सिलिंडरचा एका पाठोपाठ स्फोट झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. स्फोटात गॅस भरणा केंद्राचे मोठे नुकसान झाले असून, मोटार आणि दुचाकी जळून खाक झाली आहे. पोलिसांनी संशयित सलीम बेग यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
गॅस सिलिंडरच्या स्फोटाची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर कासार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर कार्यवाही केली. संशयित सलीम बेग हा अनेक दिवसांपासून प्रवासी वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचे काम करत होता. महिनाभरापूर्वी सुद्धा राहत्या घरी गॅस भरणा केंद्र चालवित असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमवारची घटना ही ओमनी प्रवासी गाडीत गॅस भरला जात असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. स्फोटामुळे चार ते पाच गॅस सिलिंडर, ओमनी गाडी आणि दुचाकी जळाली आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. गेल्या काही महिन्यात १० ते १२ ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही कारवाईचे सत्र सुरूच राहील, अशी माहिती पोलीस निरीक्षक कासार यांनी दिली. नागरिकांनी जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीवरही काही महिन्यांपूर्वी प्रवासी वाहनात अवैधरित्या घरगुती गॅस भरण्याचे काम सुरू असताना मोठा स्फोट झाल्याने एकाच वेळी १० जण होरपळले होते. त्यापैकी सात जणांचा रूग्णालयांत उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृतांमध्ये गॅस भरण्याचे काम करणारा दानिश शेख, मोटारीचे चालक संदीप सोपान शेजवळ, प्रवासी भरत सोमनाथ दालवाले, सूरज भरत दालवाले, संजय गणेश तेरवडीया, देवेश भरत दालवाले, रश्मी संजय दालवाले यांचा समावेश होता.
या प्रकरणी पोलीस प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आल्यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक दत्तात्रय निकम यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. प्रत्यक्षात, त्यानंतरही शहर व जिल्ह्यात वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या केंद्रांची संख्या कमी झालेली नाही.
केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी ग्राहकाला आपल्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरून ऑनलाईन पद्धतीने गॅस सिलिंडरची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. नोंदणी केल्यानंतरच सिलिंडर घरपोच मिळेल, अशी व्यवस्था तयार केली आहे. परंतु, सर्व नियमांना धाब्यावर बसवून अवैध धंदेवाल्यांनी दररोज शेकडो घरगुती गॅस सिलिंडर काळ्या बाजारातून ताब्यात घेत एक प्रकारे सरकारी यंत्रणेला आव्हान दिले आहे. यात गॅस वितरक, सिलिंडर वितरण कर्मचारी यांचा थेट सहभाग असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर उपलब्ध होऊच शकत नाही.
एखाद्या ग्राहकाने आज सिलिंडर घेतले तर पुढील काही दिवस त्याला दुसर्या सिलिंडरची करता नोंदणी करता येत नाही. असे असताना अवैध गॅस भरणा केंद्रांवर मात्र एका वेळी पाच ते सहा सिलिंडर कसे काय असतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.