जळगाव : जिल्ह्यात काही दिवसांपासून सातत्याने विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लागत आहे. शुक्रवारी सायंकाळीही अमळनेरसह पारोळा, एरंडोल आणि इतर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील शरद भिल (३५) या शेतमजुराचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. इतर काही ठिकाणी वीज कोसळल्याने दुधाळ गायींसह शेतीकामाचे बैल व बोकड मृत्युमुखी पडले.
तापमानाचा पारा ४२ अंशावर गेलेला असताना, साधारणतः पाच मे पासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस तसेच गारपिटीने तडाखा देण्यास सुरूवात केली. परिणामी १२ मेपर्यंत सुमारे १० हजार २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान परिणामी झाले. केळीच्या बागांचे सर्वाधिक ६५६५ हेक्टरचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. मका, ज्वारी, कांदा, पपई, भाजीपाला व इतर बहुवार्षिक फळपिकांचे सुद्धा बरेच नुकसान अवकाळी पावसामुळे झाले आहे.
जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर या तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तकरून पावसाचा फटका बसला आहे. कृषी व महसूल विभागाने पीक नुकसानीचे पंचनामे केले असले, तरी भरपाई कधी आणि किती मिळते त्याबाबत साशंकता कायम आहे. त्यात हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतून गारपिटीसारख्या हवामान धोक्यापासून नुकसान भरपाई मिळण्याची आशा विमा संरक्षण कालावधी संपल्याने मावळली आहे. नव्याने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू होण्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील फापोरे व कन्हेरे येथे चार बैल, पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे तीन गायी, पारोळा तालुक्यातील हिरापूर येथे एक गाय, एरंडोल तालुक्यातील गालापूर येथे दोन बोकड वीज कोसळल्याने जागीच मृत्युमुखी पडले. संबंधित सर्व पशुपालक शेतकऱ्यांना त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे.