जळगाव : जिल्ह्यातील राजकारणात काही वर्षांपासून मनसे फार सक्रीय आणि चर्चेत नव्हती. मात्र, मुंबईत उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यानंतर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साह संचारला आहे. मनसेने पक्ष संघटन बळकटीसाठी आता शाखा उघडण्याचा आणि कार्यालये सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत जळगावात मनसेच्या शाखांची संख्या २५ झाली असून, आणखी १० शाखा उघडण्यात येणार आहेत.

पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी मुंबईत मेळावा घेण्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही पक्षांची युती होण्याच्या चर्चेने राज्यात जोर धरला होता. मनसे आणि ठाकरे गटाची युती होण्याच्या आशेने जळगावातही दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह संचारला होता. त्याच उत्साहातून दोन्ही पक्षांनी एकत्र येत जळगावात हिंदी शिकविण्याच्या शासन निर्णयाची होळी केली.

एरवी कधीच एकाच व्यासपीठावर अथवा कार्यक्रमांमध्ये एकत्र न येणाऱ्या आणि एकमेकांना सदैव पाण्यात पाहणाऱ्या मनसे आणि ठाकरे गटामध्ये त्यामुळे चांगलाच एकोपा निर्माण झाला. त्यांच्यातील सलगी पाहुन भाजपसह शिंदे सेना व अजित पवार गटाने सुद्धा तोंडात बोट घातले. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या दोन्ही पक्षांनी त्यानंतर आता जळगावमध्ये आपापली राजकीय ताकद वाढविण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर ठाकरे गटाकडून जिल्हाभरात पक्षाच्या मेळाव्यांचे आयोजन केले जात असताना, मनसेने इतक्या दिवसांपासून काहीसे दुर्लक्ष झालेल्या पक्ष संघटनेच्या बळकटीकरणाकडे आता जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासकरून जळगाव शहरात नव्याने शाखा उघडून त्यांच्या कार्यालयांचे उद्घाटनही मनसेकडून ठिकठिकाणी केले जात आहे. जळगावमधील हरी विठ्ठल नगरात मनसे महिला शाखेचे आणि नव्याने सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी अनिता कापुरे यांची मनसे महिला शाखेच्या अध्यक्षपदी तर लक्ष्मी भिल यांची उपशाखाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेच्या शाखेचे हे नवीन कार्यालय नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पक्ष कार्याला बळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास बाविस्कर यांनी व्यक्त केला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे आणि महानगराध्यक्ष किरण तळेले, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, लताबाई पाथरकर आदी उपस्थित होते.