जळगाव – सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग आणि जन्म-मृत्यू विभागात पत्नीच्या जागेवर पतीला रूजू केल्याच्या आरोपावरून महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना गेल्या महिन्यात निलंबित केले होते. दरम्यान, महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने डॉ. घोलप यांना रविवारी शहर पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली.

मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा आरोप महापालिकेचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांच्यावर करण्यात आला आहे. सदर घटना महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात घडल्याचे पीडित महिला डॉक्टरने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. त्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात आता डॉ. घोलप यांना चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनीही त्यास दुजोरा दिला. विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डॉ. घोलप यांना पोलिसांनी अटक केल्याने महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

डॉ. घोलप यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत सर्व पक्षीय शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात काही दिवसांपूर्वी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी डॉ. घोलप यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही करण्यात आली होती. डॉ. घोलप यांच्या गैरवर्तवणुकीचे अनेक कारनामे उघड झाल्यावर सुद्धा त्यांना बडतर्फ केले जात नसल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्त ढेरे यांच्यावर संताप व्यक्त केला होता. दरम्यान, सहकारी डॉक्टर महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाल्याने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याविषयी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महापालिकेने थेट निलंबनाचे आदेश काढून त्यांना मोठा दणका दिला होता.

महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातही डॉ. घोलप यांच्या पराक्रमामुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त असलेल्या एका महिलेच्या जागी प्रत्यक्षात तिचा पती कर्तव्य बजावत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकाराची चौकशी काही महिन्यांपासून सुरू असताना तीन सदस्यीय चौकशी समितीने त्यासंदर्भातील अहवाल महापालिका आयुक्त ढेरे यांच्याकडे सादर केला. तक्रारीचा प्राथमिक अहवाल विशाखा समितीने आयुक्तांना दिल्यानंतर दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत आयुक्तांनी डॉ. विजय घोलप यांना दोषी ठरवून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश काढले होते.