जळगाव – सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषविण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. सत्ता महायुतीची असो की महाविकास आघाडीची, अजितदादा तिथे उपमुख्यमंत्री असतातच. २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्यानंतर अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची आशा होती. मात्र, राष्ट्रवादीने ती संधी गमावली. या सर्व आठवणी अजितदादांच्या वाढदिवशी ताज्या करत जळगावमधील त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे.
अजित पवार यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा होत असताना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले आहेत. तसेच शुभेच्छापर जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत. राष्ट्रवादीचे राज्य संघटक विनोद देशमुख, माजी नगरसेविका अश्विनी देशमुख, माजी जिल्हा उपाध्यक्ष नारायण पाटील आदींनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्या २१ वर्षांपूर्वी हुकलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या आठवणी मुद्दाम ताज्या करण्याचा केलेला प्रयत्न जास्त लक्षवेधी ठरला. ज्याची सगळीकडे चर्चाही रंगली आहे.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षापेक्षा जास्त म्हणजे ७१ आमदार निवडून देऊन महाराष्ट्राच्या जनतेने दादा तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी दिली होती. मात्र, पक्षाने (राष्ट्रवादी) ती तुम्ही मुख्यमंत्री होऊ नये म्हणून नाकारली. दुसरी गोष्ट गेल्या १५ वर्षात राष्ट्रवादीने काँग्रेसकडे एकदाही मुख्यमंत्री पदाचा दावा केला नाही. असे का ? असा प्रश्न उपस्थित करून यालाच अन्याय म्हणतात, असेही अजित पवार यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
१९९० ते २०२५ दरम्यानच्या राजकीय प्रवासात अपवाद वगळता अजित पवार हे सातत्याने सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली आणि कार्यक्षम नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा जबाबदारी सांभाळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. आताही ते महायुती सरकारमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत.
मात्र, एवढ्या दीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकिर्दीनंतरही त्यांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची एक अधूरी इच्छा कायम सलत राहिलेली दिसते. ती खंत त्यांनी वेळोवेळी अनेक व्यासपीठांवर मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं झालो? अशा शब्दांत जाहीरपणे व्यक्तही केली आहे. विशेष म्हणजे आपण एक दिवस निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ, असा दृढ विश्वास सुद्धा त्यांनी आपल्या भाषणांतून व्यक्त केला आहे. परंतु, तो योग त्यांच्या नशिबी अजून तरी आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांना मुख्यमंत्रीपदापासून इतके दिवस लांब ठेवल्याबद्दल तत्कालिन पक्ष नेतृत्वाला खोचक टोला जळगावमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हाणला आहे.