जळगाव : पाचोरा शहरात जारगाव चौफुलीवर भरधाव मालमोटारीने धडक दिल्याने एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला.
सुनील उत्तम सोनार (२६), असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर चहाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सुनील नेहमी प्रमाणे मंगळवारी रात्री ११ वाजता टपरी बंद करून दुचाकीने घरी कृष्णापुरीकडे जाण्यास निघाला होता. त्याच वेळी चौफुलीजवळून जात असलेल्या एका मालमोटारीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ज्यामुळे सुनील गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रात्री १२.३० वाजता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, भाऊ आणि वाहिनी असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली असून, अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या मालमोटार चालकाचा शोध जारगाव चौफुली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासून केला जात आहे.
घरफोडी करणारी टोळी जाळ्यात
जळगाव शहरातील लक्ष्मी नगर परिसरात घरफोडी करून संसारोपयोगी सामान चोरून नेणाऱ्या टोळीला औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. राजेंद्र दुसाने यांच्या घरातील एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस शेगडी, तांबे-पितळी भांडी यासह इतर संसारोपयोगी वस्तू चोरीला गेल्याचे १२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले होते.
दरम्यान, दुसाने यांनी दिलेल्या तक्रारीनंतर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके यांच्यासह अनुभवी अंमलदारांचे एक पथक नेमले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने लक्ष्मी नगर परिसरात सापळा रचून संदीप तुळशीराम शेवरे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार राहुल सुपडू चौधरी आणि एका अल्पवयीन मुलासह चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच संशयित आरोपी राहुल चौधरी यालाही ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली. शहरात चोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत असताना, पोलिसांनी चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
